Thursday 14 March 2013

ELove Ch-1 जबाबदारी

सकाळची वेळ. काचेचे ग्लासेस लावलेल्या इमारतीच्या जंगलातील एक इमारत आणि त्या इमारतीच्या चवथ्या मजल्यावर एक एक करुन एका आय टी कंपनीचे कर्मचारी यायला लागले होते. दहा वाजायला आले आणि कर्मचाऱ्यांची गर्दी अचानक वाढली. सगळे कर्मचारी ऑफीसमध्ये जाण्याची गर्दी आणि घाई करु लागले. कारण एकच होते - उशीर होवू नये. सगळ्या कर्मचाऱ्यांच्या येण्याची वेळ दरवाजावरच स्मार्ट कार्ड रिडरवर नोंदली जात होती. नुसती जाण्याची वेळच नव्हे तर त्यांचा दिवसभरातील एकूण आत बाहेर जाण्याचा वावरच त्या कार्ड रिडरवर नोंदवीला जात होता. कंपनीचा जो काचेचा मुख्य दरवाजा होता त्याला मॅग्नेटीक लॉक होते आणि तो दरवाजा कर्मचाऱ्यांनी आपापले कार्डस दाखविल्याशिवाय उघडत नव्हता. त्या कार्ड रिडरमुळे कंपनीचा नियमितपणाच नाही तर सुरक्षाही राखल्या जात होती. दहाचा बझर वाजला आणि तोपर्यंत कंपनीचे सर्व कर्मचारी आत पोहोचले होते. अगदी कंपनीची डायरेक्टर आणि सिईओ अंजलीसुध्दा.

अंजलीने बी.ई कॉम्प्यूटर केले होते आणि तिचं वय जास्तीत जास्त 23 असेल. तिचे वडील, आधीचे कंपनीचे डायरेक्टर आणि सिईओ, अचानक वारल्यामुळे, वयाच्या मानाने कंपनीची फार मोठी जबाबदारी तिच्यावर येवून पडली होती. नाही तर तिचं हसण्या खिदळण्याचं आणि मजा करण्याचं वय. तिचे पुढचे शिक्षण यु.एस. ला घेण्याची तिची इच्छा होती. पण वडील वारल्यामुळे तिची इच्छा अपूर्णच राहाली होती. तीही कंपनीची जबाबदारी तर चोखपणे बजावीत होतीच सोबतच आपला अल्लडपणा अवखळपणा जपण्याच्या सारख्या प्रयत्नात असायची.

अंजली हॉलमधून दोन्ही बाजुला असलेल्या क्यूबिकल्सच्या मधील रस्त्यातून आपल्या कॅबिनकडे निघाली. तशी ती ऑफीसमध्ये कॅजुअल्सच वापरणे प्रिफर करायची - ढीला पांढरा टी शर्ट आणि कॉटनचा ढीला बदामी पॅंन्ट. अगदीच एखाद्या प्रोग्रॅममध्ये किंवा स्पेशल क्लायंटसोबत मिटींग असेल तेव्हाच ती फॉर्मल ड्रेस घालायची. ऑफीसच्या बाकी स्टाफ आणि डेव्हलपर्सनाही फॉर्मल ड्रेसची काही ताकीद नव्हती. ते ज्यात कंफर्टेबल असतील असा साधा आणि सुटसुटत पेहराव करण्याची सगळ्यांना सूट होती. ऑफीसमधल्या कामाबद्दल अंजलीचं एक सूत्र होतं. की तुम्ही ऑफीसमधलं कामही ऍन्जॉय करु शकले पाहिजे. जर तुम्ही कामही ऍन्जॉय करु शकले तर तुम्हाला कामाचा शिन कधीच येणार नाही. तिने ऑफीसमध्येही काम आणि विरंगूळा किंवा छंद याची चांगली सांगड घालून तिच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रॉडक्टीव्हीटी वाढवली होती. तिने ऑफीसध्ये स्विमींग पुल, झेन चेंबर, मेडीटेशन रुम, जीम, टी टी रुम अश्या वेगवेगळ्या सुविधा कर्मचाऱ्यांना देवून त्यांची ऑफीसची ओढ आणि आपलेपणा वाढविण्याचा प्रयत्न केला होता. आणि तिला त्याचे चांगले परिणामही दिसायला लागले होते.

तिच्या ऑफीसकडे जाता जाता तिला तिच्या कंपनीचे काही कर्मचारी क्रॉस झाले. त्यांनी तिला अदबीने विश केलं. तिनेही एक गोड स्माईल देत त्यांना विश करुन प्रतिउत्तर दिलं. ते नुसते भितीपोटी तिला विश करीत नव्हते तर तिच्या कर्मचाऱ्यांच्या मनात तिच्याबद्दलचा तिच्या कर्तुत्वाबद्दलचा एक आदर दिसत होता. ती तिच्या कॅबिनजवळ पोहोचली. तिच्या कॅबिनचंही एक वैशीष्ट होतं की तिची कॅबिन बाकिच्या कर्मचाऱ्यांपेक्षा भारी सामानाने भरलेली नसून ज्या सुविधा तिच्या कर्मचाऱ्यांना होत्या त्याच तिलाही तिच्या कॅबिनमध्ये पुरवल्या गेलेल्या होत्या. 'मीही तुमच्यातलीच एक आहे' ही भावना त्यांच्यात रुजावी म्हणून कदाचित असे असेल.

ती तिच्या कॅबिनजवळ पोहोचताच तिने तिच्या कॅबिनचं स्प्रिंग असलेलं ग्लास डोअर आत ढकललं आणि ती आत शिरली.


क्रमश:...  


Read agriculture ( Please Add Skeep ) ..............

No comments:

Post a Comment