Friday 15 March 2013

CH-23 अवार्ड

त्या मनाला सलणाऱ्या, नव्हे मनाला पुर्णपणे उध्वस्त करु पाहणाऱ्या प्रसंगाला आता 10-15 दिवस तरी झाले असतील. त्या प्रसंगाला जेवढं शक्य होईल तेवढं विसरुन अंजली आता पुर्ववत आपल्या कामात मग्न झाली होती. किंबहूना त्या कटू आठवणी आणि त्या कटू यातना टाळण्यासाठी तिने स्वत:ला पुर्णपणे कामात डूबवून घेतले होते. मंध्यतरीच्या काळात अंजलीला आयटी क्षेत्रात एक मानाचा समजल्या जाणारा 'आय टी वुमन ऑफ द ईअर' अवार्ड मिळाला होता. त्या अवार्डच्या निमित्ताने बऱ्याच प्रेसवाल्यांची तिच्याकडे रिघ लागली होती. तिलाही ती रिघ हवीहवीशी वाटत होती. त्या निमित्ताने तिचा एकटेपणा टाळल्या जात होता आणि एकटेपणा टळल्यामुळे त्या कटू आठवणी तिला सतावित नव्हत्या. मागील चारपाच दिवसांपासून जवळपास रोजच कधी वर्तमान पत्रात तर कधी टीव्हीवर तिचे इंटरव्हू झळकत होते.

अंजली ऑफीसमधे बसलेली होती. शरवरी तिच्या बाजुलाच बसून तिच्या कॉम्प्यूटरवर काम करीत होती. तो वाईट अनुभव आल्यापासून अंजलीचं चॅटींग आणि मित्रांना मेल पाठविणं एकदमच कमी झालं होतं. फावल्या वेळात ती नुसतीच बसून शुन्यात बघत विचार करीत असायची. तिच्या मनात विचारांचा अगदी गोंधळ उडत असे. पण ती ताबडतोब ते विचार आपल्या डोक्यातून झटकून टाकायची. आताही तिच्या मनात विचारांचा कसा गोंधळ उडाला होता. तिने ताबडतोब आपल्या मनातले विचार झटकून मनाला दुसऱ्या कामात गुंतविण्याचा प्रयत्न करीत टेबलचा ड्रावर उघडला. ड्रॉवरमधे तिला ते तिने जपून ठेवलेले वर्तमानपत्राचे कात्रण दिसले. ' आय टी वुमन ऑफ द इअर - अंजली अंजुळकर' वर्तमानपत्राच्या कात्रणारवर हेडलाईन होती. तिने ते कात्रण बाहेर काढून टेबलवर पसरविले आणि पुन्हा ती बातमी वाचायला लागली.

ही बातमी वाचायला आता यावेळी आपले वडील असायला पाहिजे होते...

तिच्या मनात एक विचार चमकून गेला.

किती अभिमान वाटला असता त्यांना... आपल्या लेकीचा...

पण नियतीसमोर कुणाचे काय चालते...

आता बघा ना हाच एक ताजा अनूभव...

ती विचार करीत होती तेवढ्यात कॉम्प्यूटरचा बझर वाजला.

बऱ्याच दिवसांपासून चॅटींग आणि मेलींग कमी केल्यापासून सहसा कॉम्प्यूटरवर कुणाचा मेसेज येत नसे....

मग आज हा कुणाचा मेसेज असावा...

कुणी हितचिंतक?...

की कुणी हितशत्रू...

आजकाल कसं प्रत्येक गोष्टीमधे तिला दोन्ही बाजू दिसत असत- एक चांगली आणि एक वाईट. ठेच लागल्यावर माणून प्रत्येक पावूल कसा जपून टाकतो तसं.

अंजलीने वळून मॉनीटरकडे पाहाले.

'' विवेकचा मेसेज आहे...'' कॉम्प्यूटरवर बसलेली शरवरी अंजलीकडे पाहून भितीयूक्त स्वरात म्हणाली.

शरवरीच्या चेहऱ्यावर भिती आणि आश्चर्य साफ दिसत होतं. त्याच भावना आता अंजलीच्या चेहऱ्यावरही उमटल्या होत्या. अंजली ताबडतोब उठून शरवरीजवळ गेली. शरवरी अंजलीला कॉम्प्यूटरसमोर बसण्यास जागा देवून उठून तिथून बाजूला झाली. अंजलीने कॉम्प्यूटरवर बसण्यापुर्वी शरवरीला काहीतरी खुणावले तशी शरवरी ताबडतोब दरवाजाजवळ जावून अंजलीच्या कॅबिनमधून लगबगीने बाहेर पडली.

'' मिस. अंजली ... हाय ... कशी आहेस?'' विवेकचा तिकडून आलेला मेसेज अंजलीने वाचला.

एक क्षण तिने विचार केला आणि तीही चॅटींगचा मेसेज टाईप करु लागली -

'' ठीक आहे... '' तिने मेसेज टाईप केला आणि सेंड बटनवर क्लीक करुन तो मेसेज पाठवून दिला.

'' तुला पुन्हा त्रास देतांना मला वाईट वाटतं आहे... पण काय करणार ... पैसा ही साली गोष्टच वेगळी असते... कितीही जपून वापरली तरी संपून जाते...'' तिकडून विवेकचा मेसेज आला.

अंजलीला शंका आली होतीच की तो अजून पैसे मागणार...

'' मला यावेळी 20 लाख रुपयाची नितांत गरज आहे...'' तिकडून विवेकचा मेसेज आला.

'' आत्ता तर तुला 50 लाख रुपए दिले होते... आता माझ्याजवळ पैसे नाही आहेत...'' अंजलीने पटकन टाईप करुन मेसेज पाठवला सुध्दा.

मेसेज टाईप करतांना तिच्या डोक्यात अजूनही बऱ्याच विचारांचं चक्र सुरु होतं.

'' बस हे शेवटचं... कारण हे पैसे घेवून मी परदेशात जाण्याचा विचार करतोय'' तिकडून विवेकचा मेसेज आला.

'' तु परदेशात जा... नाहीतर कुठेही जा ... मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही ... हे बघ... माझ्याजवळ काही पैशाचं झाड नाही आहे... '' अंजलीने मेसेज पाठवला.

'' ठिक आहे... तुला आता मला कमीत कमी 10 लाख रुपए तरी द्यावे लागतील... पैसे केव्हा कुठे आणि कसे पाठवायचे ते मी तुला मेल करुन सांगीन...'' तिकडून मेसेज आला.

अंजली काही टाईप करुन त्याला पाठविणार त्याआधीच विवेकचा चॅटींग सेशन बंद झाला होता. अंजली एकटक तिच्या समोरच्या कॉम्प्यूटरच्या मॉनिटरकडे पहायला लागली. ती मॉनिटरकडे पाहत होती खरी पण तिच्या डोक्यात डोक्यात आता विचारांचं काहूर माजलं होतं. पण पुन्हा तिच्या डोक्यात काय आलं काय माहित ती पटकन उठून तरातरा आपल्या कॅबिनमधून बाहेर पडली.


क्रमश: ... 



Read Kunadali ( Please Add Skeep ) ....................

No comments:

Post a Comment