Thursday 14 March 2013

CH-13 वर्सोवा बीच

अंजली वर्सोवा बीचवर येवून विवेकची वाट पहायला लागली. तिने एकदा घड्याळाकडे बघितलं. त्याला यायला अजून वेळ होता. म्हणून तिने समुद्राच्या काठावर उभं राहून समुद्रावर दुरवर एक नजर फिरवली. नजर फिरवता फिरवता तिचे मन भूतकाळात डोकावू लागले. तिच्या मनात तिच्या बालपणीच्या आठवणी उचंबळून यायला लागल्या...

वर्सोवा बीच हे अंजलीचं मुंबईतलं आवडतं ठिकाण. लहानपणी ती तिच्या आई वडिलांसोबत इथे नेहमी येत असे. तिला तिच्या आईवडीलांच्या आठवणीने दाटून येत होते. आता जरी हा समुद्रकिनारा स्वच्छ वाटत नसला तरी तिच्या लहानपणी तो आतापेक्षा बराच स्वच्छ होता. समोर समुद्राच्या लाटांचा आवाज अजूनच तिच्या हृदयात कालवाकालव करीत होता.

तिने मनगटावरच्या घड्याळावर पुन्हा एक नजर टाकली. विवेकला तिने संध्याकाळी पाचची वेळ दिली होती.

पाच वाजुन गेले तरी तो अजून कसा आला नाही?...

तिच्या मनात प्रश्न डोकावून गेला.

कुठे ट्रॅफिकमधे अडकला असेल...

मुंबईची ट्रॅफिक म्हणजे... कधी माणूस कुठे अडकेल काही नेम नसतो...

तिने पुन्हा सभोवार आपली नजर फिरवली.

समोर किनाऱ्यावर एक मुलगा समुद्राच्या किनाऱ्यावर रेतीसोबत खेळत होता. ते पाहून पुन्हा तिच्या मनाने भूतकाळात झेप घेतली आणि ती पुन्हा बालपणाच्या आठवणीत बुडून गेली.

ती तेव्हा 12-13 वर्षाची असेल जेव्हा ती आई वडिलांसोबत याच बीचवर आली होती. ती तिची आई आणि वडील, तो मुलगा जिथे खेळत होता, जवळपास तिथेच वाळूचा किल्ला बनवित होते. तेवढ्यात तिचे वडील तिला म्हणाले होते,

'' बघ अंजली तिकडे तर बघ...''

समद्राच्या किनाऱ्यावर एक मुलगा काहीतरी वस्तू समुद्रामध्ये दूरवर फेकण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. तो मुलगा ती वस्तू जोरात आत समुद्रात फेकत होता. पण समुद्राच्या लाटा त्या वस्तूला पुन्हा किनाऱ्यावर आणून सोडीत. तो मुलगा पुन्हा पुन्हा त्या वस्तूला समुद्रामध्ये खूप दूरवर फेकण्याचा प्रयत्न करी आणि पुन्हा पुन्हा त्या लाटा त्या वस्तूला काठावर आणून सोडीत.

मग तिचे वडिल तिला म्हणाले होते -

'' बघ अंजली तो मुलगा बघ... तो ती वस्तू समुद्रात दूरवर फेकण्याचा प्रयत्न करतो आणि ती वस्तू पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येते... माणसाच्या जिवनात दु:ख आणि सुखाचं असंच असतं... माणूस जसं जसं आपल्या जिवनातील दु:खाला दूर सारण्याचा प्रयत्न करतो...त्यावेळेपुरतं वाटतं की आता दु:ख पुन्हा कधीच येणार नाही... पण दु:खाचं त्या वस्तूसारखं असतं... जितकं तुम्ही त्याला दुर फेकण्याचा प्रयत्न करणार ते पुन्हा तेवढ्याच जोराने किनाऱ्यावर येणार... आता बघ तो मुलगा थोड्या वेळाने आपल्या खेळण्यात गुंग होईल ... आणि त्या वस्तूला तो पुर्णपणे विसरुन जाईल ..मग जेव्हा त्याला त्या वस्तूची आठवण येईल... ती वस्तू त्याला किनाऱ्यावर शोधून सुध्दा सापडणार नाही ... तसंच माणसाने दु:खामधे न गुरफटता ... सुख दु:खांना स्थितप्रज्ञतेने जर तोंड दिलं तर त्याला त्या दु:खाचा त्रास होणार नाही ...देअर विल बी पेन बट टू सफर ऑर नॉट टू सफर वील बी अप टू यू!''

तिला आठवत होतं की तिचे वडिल कसे छोट्या छोट्या गोष्टीतून खुप काही बोलून जायचे.

जेव्हा अंजली आपल्या आठवणीच्या तंद्रीतून बाहेर आली, तिच्यासमोर विवेक उभा होता. उंचापूरा, धडधाकट, चेहऱ्यावर स्मित हास्य आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवरुन ओसंडणारा अपूर्व उत्साह. तिने पाहालेल्या फोटतल्यापेक्षा कितीतरी देखणा तो वाटत होता. ते एकमेकांना पहिल्यांदाच भेटत असल्यामुळे दोघांचे चेहरे आनंदाने उजळलेले होते. दोघंही एकमेकांकडे नुसते एकटक बघत होते.


क्रमश:... 


Read agriculture ( Please Add Skeep ) ..........

No comments:

Post a Comment