Thursday 14 March 2013

CH- 9 वेगळेपणा

अंजलीने कॉम्प्यूटरवर आलेला विवेकचा चॅटींग मेसेज उघडला खरा पण तिला तिचं हृदय धडधडत आहे असं जाणवायला लागलं. तिला स्वत:लाच आपल्या बेचैन मन:स्थितीचे आश्चर्य वाटत होते. तिने पटकन त्याने पाठविलेला मेसेज वाचला -

'' हाय गुड मॉर्निंग ... हाऊ आर यू?'' त्याच्या मेसेज विंडोत लिहिलेले होते.

तिने आपण उगाचच गुरफटत तर नाही ना चाललो याची स्वत:शीच खात्री करुन जपूनच उत्तर टाईप केले -

'' फाईन...''

आणि उगीचच आपल्या मनाची अधिरता दिसून येवू नये म्हणून तिने एक ते शंभर पर्यंत आकडे मोजले आणि मग बरीच वेळ झाली आहे याची खात्री करीत सेंड बटनवर क्लीक केले.

'' काल मी गावाला गेलो होतो'' तिकडून ताबडतोब विवेकचा मेसेज आला.

' तू काल का चॅटींगवर भेटला नाहीस?' या अंजलीच्या मनात घोळत असलेल्या प्रश्नाला उत्तर देवून त्याने जणू तिच्या हृदयाचाच ठाव घेतला आहे असे तिला वाटले.

खरंच मनकवडा की काय हा?...

अंजलीला एक क्षण वाटून गेले.

'' हो का?'' तिनेही खबरदारी म्हणून कोरडीच प्रतिक्रिया व्यक्त केली.

'' अजून काही विचारणार नाहीस?'' त्याने विचारले.

ती त्याचा मेसेज आल्यानंतर उत्तर देण्यास मुद्दाम विलंब लावीत होती पण त्याचे मेसेजेस ताबडतोब, जणू मेसेज मिळण्याच्या आधीच टाईप केल्याप्रमाणे येत होते.

'' तूच विचारकी '' तिने रिप्लाय पाठविला.

तिला उगीचच मुलगा मुलगी पहायला आल्यानंतर वेगळ्या खोलीत जावून जसे बोलतात तसे वाटायला लागले.

'' अगं त्या दिवशी मी तुला ब्लॅंक मेल यासाठी पाठवली होती की तुझी मला काहीच माहिती नाही ... मग काय लिहिणार?... पण मेल पाठविल्याशिवाय राहवेना... मग दिली पाठवून ब्लॅंक मेल..''

मग त्यानेच पुढाकार घेवून विचारले, '' बरं तू काय करतेस?... म्हणजे शिक्षण की जॉब?''

'' मी बी. ई. कॉम्प्यूटर केले आहे... आणि जी. एच. इन्फॉरमॅटीक्स या स्वत:च्या कंपनीची मी सध्या मॅनेजींग डायरेक्टर आहे'' तिने मेसेज पाठविला.

तिला माहित होते की चॅटींगमधे आधीच स्वत:ची खरी माहिती देणं धोकादायक असतं. पण तरीही ती स्वत:ची खरी माहीती जणू तिच्या नकळत टाईप करीत होती आणि पाठवित होती.

'' अरे .. बापरे!.. '' तिकडून विवेकची प्रतिक्रिया आली.

'' तुला तुझं वय विचारलं तर राग तर येणार नाही ना?... नाही ... म्हणजे मी कुठेतरी वाचलं आहे की स्त्रियांना त्यांचं वय विचारलेलं आवडत नाही म्हणून ... '' त्याने तिला जपूनच प्रश्न विचारला.

तिने पाठविले, '' 23 वर्ष''

'' अगं हे तर मला आधीच माहित होतं... मी तुझ्या मेल आयडी वरुन बघितलं होतं ... खरं सांगू? तू जेव्हा सांगितलंस की तू मॅनेजींग डायरेक्टर आहेस ... तर माझ्या समोर 45-50 वयाच्या एका वयस्कर बाईचं चित्र उभं राहालं होतं ...'' तो थोडा मोकळा बोलत होता.

तिला त्याच्या गमतीदार स्वभावाचं गालातल्या गालात हसू येत होतं. त्याने तिचं वय सायबर सर्च द्वारे शोधलं हे जाणून तो सुद्धा तिच्याबाबत तेवढाच उत्कट असल्याचं तिला जाणवलं.

'' तू तुझं वय नाही सांगितलंस?...'' तिने प्रतिप्रश्न केला.

'' मी माझ्या मेल ऍड्रेसच्या माहितीत ... माझं खरं वय लिहिलं आहे...'' त्याचा तिकडून मेसेज आला.

त्याच्या या उत्तराने तिला त्याच्यातला वेगळेपणा अजूनच जाणवत होता.


क्रमश:... 


ReaD LoVE sTORI ( Please Skeep )......

No comments:

Post a Comment