Thursday 14 March 2013

CH-21 विवेक कुठे गेला असावा?

जॉनी आपल्याच धूनमधे मस्त मजेत शिळ घालत रस्त्यावर चालत होता. तेवढ्यात त्याला मागून अनपेक्षीतपणे कुणीतरी आवाज दिला.

'' जॉनी...''

जॉनी शिळ वाजवायचं थांबवून एक क्षण तिथेच थबकला. आवाज ओळखीचा वाटत नव्हता म्हणून त्याने मागे वळून बघितले. एक माणूस घाई घाईने त्याच्याजवळ येत होता. जॉनी त्या माणसाकडे असमंजसपणे बघायला लागला कारण तो त्या माणसाला ओळखत नव्हता.

मग याला आपलं नाव कसं काय माहित झालं?..

जॉनी विचार करीत गोंधळलेल्या मनस्थितीत उभा होता. तोपर्यंत तो माणूस येवून त्याच्याजवळ पोहोचला.

'' मी विवेकचा मित्र आहे... मी त्याला कालपासून शोधत आहे... मला कॅफेवरच्या त्या पोराने सांगितले की कदाचित तुला माहित असेल'' तो माणूस म्हणाला.

कदाचित त्या माणसाने जॉनीच्या मनाचा उडालेला गोंधळ ओळखला असावा.

'' नही तसा तर तो मला सांगून गेला नाही ... पण मी काल त्याच्या होस्टेलवर गेलो होतो... तिथे त्याचा एक मित्र सांगत होता की तो 10-15 दिवसांकरीता कुण्या नातेवाईकाकडे गेला आहे...'' जॉनीने सांगितले.

'' कोणत्या नातेवाईकाकडे ?'' त्या माणसाने विचारले.

'' नाही तेवढं मला माहित नाही ... त्याला मी तसं विचारलं होतं पण ते त्यालाही माहित नव्हतं ... त्याला फक्त त्याची मेल आली होती'' जॉनीने माहिती पुरवली.

अंजली आपल्या खुर्चीवर बसलेली होती आणि तिच्या समोर टेबलवर एक बंद ब्रिफकेस ठेवलेली होती. तिच्या समोर शरवरी बसलेली होती. त्यांच्यात एक गुढ शांतता पसरली होती. अचानक अंजली उठून उभी राहाली आणि आपला हात हळूच त्या ब्रिफकेसवरुन फिरवीत म्हणाली, '' सगळ्या बाबी पुर्णत: लक्षात घेतल्या तर एकच गोष्ट ठळकपणे समोर येते..''

'' कोणती?'' शरवरीने विचारले.

'' की आपल्याला त्या ब्लॅकमेलरला 50 लाख देण्याव्यतिरिक्त आपल्याजवळ सध्यातरी दुसरा मार्ग नाही आहे... आणि आपण रिस्कसुद्धा तर घेवू शकत नाही''

'' हो तुझं बरोबर आहे'' शरवरी अधांतरी बघत काहीतरी विचार केल्यागत म्हणाली.

अंजलीने ती ब्रिफकेस उघडली. ब्रिफकेसमधे हजार हजारचे बंडल्स व्यवस्थीत एकावर एक असे रचून ठेवलेले होते. तिने त्या नोटांवर एक नजर फिरवली, मग ब्रिफकेस बंद करुन उचलली आणि लांब लांब पावले टाकीत ती तिथून निघून जावू लागली. तेवढ्यात तिला मागून शरवरीने आवाज दिला -

'' अंजली...''

अंजली ब्रेक लागल्यागत थांबली आणि शरवरीकडे वळून पाहू लागली.

'' काळजी घे '' शरवरी तिच्याबद्दल काळजी वाटून म्हणाली.

अंजली दोन पावले पुन्हा आत आली, शरवरीजवळ गेली, शरवरीच्या खांद्यावर तिने हात ठेवला आणि वळून पुन्हा भराभर पावले टाकीत तिथून निघून गेली.


क्रमश:...   



Read Samaj ( Please Add Skeep ) ..................

No comments:

Post a Comment