Friday 15 March 2013

CH-32 सायबर कॅफेच्या बाहेर

त्या माणसाच्या मागे सायबर कॅफेच्या बाहेर जाता जाता विवेकच्या डोक्यात विचारांची गर्दी झालेली होती.

तिने तर आपल्याला जे झालं ते विसरुन जाण्याची मेल केली होती...

मग अचानक ती पळून का आली असावी....

कदाचित तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर दबाव आणला असेल...

आणि म्हणून तिने ती मेल लिहिली असावी...

एव्हाना विवेक त्या माणसाच्या मागे मागे सायबर कॅफेच्या बाहेर पोहोचला होता. बाहेर सर्वत्र अंधार होता आणि अंधारात एका कोपऱ्यात त्याला एक खिडक्यांना सर्व काळे काच लावलेली कार दिसली.

याच गाडीत आली असावी अंजली...

तो माणूस जसा त्या गाडीकडे जावू लागला विवेकही त्याच्या मागे त्या गाडीकडे निघाला. गाडीच्या जवळ पोहोचताच त्याच्या लक्षात आले की गाडीचा मागचा दरवाजा उघडा आहे.

दरवाजा उघडा ठेवून ती आपली वाट पाहात असावी...

गाडीच्या अजून जवळ पोहोचताच विवेकने मागच्या उघड्या दारातून अंजलीसाठी आत डोकावून बघितले.

पण हे काय?...

तेवढ्यात कुणी काळ्या आकृतीने मागून येवून त्याच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा रुमाल ठेवला आणि त्याला आत गाडीत ढकलले. तो आत जाण्यासाठी प्रतिकार करु लागला तसे त्याने अक्षरश: त्याला जबरदस्ती आत कोंबले. गाडीचा दरवाजा बंद झाला आणि गाडी वेगात धावायला लागली. विवेकच्या लक्षात आले होते की त्याच्यासोबत काहीतरी दगाफटका झालेला आहे. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. त्याला आता त्याची शुध्द हरपत असलेली जाणवत होती.

ज्या माणसाने विवेकला गाडीपर्यंत आणले होते त्याने खिशातून पैसे काढले आणि तो ते मोजत तिथून निघून गेला.

विवेक एका बेडवर बेशुद्ध पडलेला होता. आता हळू हळू त्याला शुध्द येत होती. जसा तो पुर्णपणे शुद्धीवर आला त्याला आपण एका अनभिज्ञ ठिकाणी आहोत याची जाणीव झाली. तो ताडकन उठून बसला आणि त्याने आपली नजर चहुकडे फिरवली. त्याच्या समोर अलेक्स आणि त्याचे दोन साथीदार काळ्या पेहरावात त्याच्या समोर बसलेले होते. त्यांचे चेहरेही काळ्या कापडाने झाकलेले होते. विवेकने उठून उभं राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याचे हातपाय कापडाच्या पट्यांनी घट्ट बांधलेले आहेत.

तश्याच परिस्थीत जोर लावून पुन्हा उठून उभं राहण्याच्या प्रयत्नात तो त्यांना म्हणाला, '' कोण आहात तुम्ही... मला इथे कुठे आणलं तूम्ही...''

'' काळजी करु नकोस ... इथे आम्ही तुला थाटामाटात ठेवणार आहोत... आम्ही तुला अंजलीजींच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार इथे आणलं आहे... तसे ते खुप चांगले लोक आहेत... सहसा अशा भानगडीत पडत नाहीत ... पण काय करणार यावेळी नाईलाज झाला... तरीही त्यांनी तुला काही एक त्रास होणार नाही याची आम्हाला ताकीद दिली आहे... ''

अलेक्स तिथून उठून निघून जायला लागला तेव्हा विवेक ओरडला.

'' मला सोडून द्या... मला पकडून तुम्हाला काय मिळणार आहे?''

अलेक्स जाता जाता थांबला, आणि तोंडावर बोट ठेवून विवेकला म्हणाला.

'' चूप जास्त आवाज नाही करायचा... ''

मग त्याच्या दोन साथीदारांकडे पाहत तो म्हणाला, '' ओय... तुम्ही दोघं याच्यावर लक्ष ठेवा... ''

मग पुन्हा विवेककडे पाहत अलेक्स म्हणाला, '' अन मजनू तू... जास्त चालाकी किंवा हुशारी करण्याचा प्रयत्न करु नकोस ... नाहीतर दोन्ही पाय तोडून तुझ्या हातात देवू आम्ही... आणि लक्षात ठेव अंजलीजीचे नातेवाईक चांगले लोक असतील... आम्ही नाही... ''

अलेक्स समोर आणि त्याचे दोन साथीदार याच्या मागे मागे खोलीच्या बाहेर गेले. त्यांनी खोलीला बाहेरुन कुलूप लावून चाबी त्या दोघांपैकी एकाजवळ ठेवण्यास बजावले आणि अलेक्स तिथून निघून गेला.


क्रमश:... 



Read Shree Saptashrung Nivasini Devi Tru...

No comments:

Post a Comment