Friday 15 March 2013

CH-22 ब्रिफकेस

घनदाट जंगल. जंगलात चहुबाजुकडे वाढलेली उंच उंच झाडे दिसत होती. आणि झाडाखाली वाळलेली झाडांची पानं पसरलेली होती. जंगलातील झाडाच्या मधील अरुंद जागेतून रस्ता शोधीत एक काळी काचं चढवलेली काळी कार नागमोडी वळने घेत त्या वाळलेल्या पानांतून चालू लागली. त्या कारच्या चालण्यासोबतच त्या वाळलेल्या पानांचा एक विचित्र चुरगाळल्यासारखा आवाज येत होता. हळू चालत असलेली ती कार त्या जंगलातून रस्ता काढीत काढीत एका झाडाजवळ येवून थांबली. त्या कारच्या ड्रायव्हर सिटचा काळा काच हळू हळू खाली सरकला. ड्रायव्हींग सिटवर अंजली काळा गॉगल घालून बसली होती. तिने कारचे इंजीन बंद केले आणि बाजुच्या झाडाच्या बुंध्यावर लागलेल्या लाल खुणेकडे बघितले.

तिने हेच ते झाड अशी मनाशी खुनगाठ बांधली असावी...

नंतर तिने जंगलात चौफेर एक दृष्टी फिरवली. दुर-दुरपर्यंत एक चिटपाखरुही दिसत नव्हते. जवळपास कुणाचंही अस्तीत्व नसावं याची शाश्वती करुन तिने तिच्या पलिकडील सिटवर ठेवलेली ब्रिफकेस उचलून प्रथम आपल्या मांडीवर घेतली. ब्रिफकेसवर दोनदा आपला हाथ थोपटून तिने आपल्या मनाचा निश्चय पुन्हा पक्का केला असावा. आणि जणू आपला निश्चय पुन्हा डगमगला जाईल का काय या भितीने तिने पटकन ती ब्रिफकेस कारच्या खिडकीतूनच्या त्या झाडाच्या बुंध्याच्या दिशेने फेकली. धप्प आणि सोबतच वाळलेल्या पानांचा चुरगाळल्यासारखा एक विचित्र आवाज आला.

झाले आपले काम संपले...

चला आपली या प्रकरणातून एकदाची सुटका झाली...

असा विचार करुन तिने सुटकेचा निश्वास टाकला. पण पुढच्या क्षणीच तिच्या मनात एक विचार डोकावून गेला.

खरोखरच आपली या प्रकरणातून सुटका झाली का?...

तिने पुन्हा आजुबाजुला बघितले. आजुबाजुला कुठेही काहीही मानवी हालचाल दिसत नव्हती. तिने पुन्हा कार स्टार्ट केली. आणि कार गर्रकन वळवून ती तिथून वेगात निघून गेली. जणू तिथून निघून जाणे हे तिच्यासाठी त्या प्रकरणातून कायमचे सुटण्यासारखे होते.

कार निघून गेली तशी त्या सुनसान जागेत एका झाडावर एका उंच जागी एक मानवी हालचाल जाणवली. एका झाडाच्या पानाच्या रंगाचे हिरवे कपडे घातलेल्या, तोंडावर त्याच रंगाचे कापड गुंडाळलेल्या आणि उंच झाडावर बसलेल्या एका माणसाने त्याच हिरव्या रंगाचा वायरलेस आपल्या तोंडाजवळ नेला.

'' सर एव्हरी थींग इज क्लिअर ... यू कॅन प्रोसीड'' तो वायरलेसमधे बोलला आणि पुन्हा आपली चौकस नजर इकडे तिकडे फिरवू लागला. कदाचित ती कार निघून गेली ती परत तर येत नाही ना. किंवा त्या कारचा पाठलाग करीत इथे अजून कुणी तर आलं नाहीना याची तो खात्री करीत असावा.

'' सर एव्हती थींग इज क्लिअर... कन्फर्मींग अगेन'' तो पुन्हा वायरलेसमधे बोलला.

त्या झाडावरच्या माणसाचा इशारा मिळताच ज्या झाडाच्या बुंध्यावर लाल निशान केले होते त्या झाडाच्या बाजुलाच असलेल्या एका मोठ्या वाळलेल्या पानांच्या ढिगामधे हालचाल झाली. कार सुरु झाल्याचा आवाज आला आणि त्या वाळलेल्या पानांच्या ढिगाला बाजुला सारत, त्यातून एक कार बाहेर आली. ती कार हळु हळू पुढे सरकत जिथे ती ब्रीफकेस पडलेली होती तिथे गेली. कारमधून एक काळे कपडे आणि तोंडावर काळे कापड बांधलेला एक माणूस बाहेर आला. त्याने चौकस नजरेने इकडे तिकडे बघितले. जिथे त्याचा माणूस झाडावर बसलेला होता तिकडे पाहाले आणि त्याला अंगठा दाखवून इशारा केला. झाडावर बसलेल्या माणसानेही अंगठा दाखवून प्रतिसाद दिला आणि सर्वकाही कंट्रोलमधे असल्याचा संकेत दिला. त्या कारमधून उतरलेल्या त्या काळे कपडे घातलेल्या माणसाने आजुबाजुला कुणी पाहत तर नाही ना याची खात्री करीत ती खाली पडलेली ब्रीफकेस हळूच उचलली. ब्रीफकेस उचलून घेवून कारच्या बोनटवर ठेवून उघडून बघितली. हजार रुपयांची एकमेकांवर ठेवलेली बंडल्स दिसताच त्याच्या चेहऱ्यावर लावलेल्या काळ्या कपड्याच्या मागे लपलेल्या चेहऱ्यावर नक्कीच आनंदाची एक लहर पसरली असेल. आणि त्या नोटांचा सुगंध त्याच्या नाकातून शिरुन त्याच्या डोक्यापर्यंत भिनला असेल. त्याने त्यातलं एक बंडल उचलून बोट फिरवून चाळून बघितलं आणि पुन्हा ब्रिफकेसमधे ठेवून दिलं. त्याने पुन्हा ब्रिफकेस बंद केली. झाडावर बसलेल्या माणसाला पुन्हा अंगठा दाखवून सगळे व्यवस्थित असल्याचा इशारा केला. ती काळी आकृती पुन्हा ब्रिफकेस घेवून तिच्या कारमधे येवून बसली. कारचे दरवाजा बंद झाला, कार सुरु झाली आणि हळू हळू वेग पकडत भन्नाट वेगाने ती कार तिथून नाहीशी झाली. जणू तिथून निघून जाणे हे त्या व्यक्तीसाठी त्या नोटांवर लवकरात लवकर कायमचा हक्क मिळविण्यासारखे होते.


क्रमश: 

No comments:

Post a Comment