Thursday 14 March 2013

CH 12 हॉटेल ओबेराय

विवेक सायबर कॅफेमधे आपल्या कॉम्प्यूटवर बसला होता. पटापट हाताची सफाई करुन काही जादू केल्यागत त्याने गुगलमेल ओपन करताच त्याला अंजलीची मेल आलेली दिसली. त्याचा चेहरा आनंदाने चमकायला लागला. त्याने एक क्षणही न दवडता पटकन डबल क्लीक करुन ती मेल उघडली आणि वाचायला लागला -

'' विवेक ... 25 तारखेला सकाळी बारा वाजता एका मिटींगसाठी मी मुंबईला येत आहे... 12.30 वाजता हॉटेल ओबेरायला पोहचेन... आणि मग फ्रेश वगैरे होवून 1.00 वाजता मिटींग अटेंड करेन... मिटींग 3-4 वाजेपर्यंत संपेल... तु मला बरोबर 5.00 वाजता वर्सोवा बिचवर भेट... बाय फॉर नॉऊ... टेक केअर''

विवेकने मेल वाचली आणि आनंदाने उठून उभा राहत '' यस्स...'' म्हणून ओरडला.

सायबर कॅफेतले बाकी जण काय झालं म्हणून त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तेव्हा तो भानावर आला आणि लाजून खाली बसला.

तो पुन्हा आपल्या रिसर्चच्या संदर्भात इंटरनेटवर सर्च ईंजीनवर माहिती शोधू लागला. पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. केव्हा एकदा तो दिवस उजाडतो की ज्या दिवशी अंजली मुंबईला येते आणि आपण तिला वर्सोवा बिचवर भेटतो असं त्याला झालं.

' वर्सोवा बिच' त्याच्या डोक्यात आलं पण त्या बिचचं त्याच्या डोक्यात चित्र उभं राहीना. कारण तो तिथे कधी गेला नव्हता. वर्सोवा बिचचं नाव तो ऐकुन होता पण तो कधी तिथे प्रत्यक्षात गेला नव्हता. तसा तो मुंबईला राहून पिएचडी करीत होता खरा पण तो कधी जास्त फिरत नसे. मुंबईची बरीच ठिकाणं त्याने पाहिली नव्हती. इथे बसल्या बसल्या काय करावं म्हणून त्याने गुगल सर्च ओपन केलं आणि त्यावर 'वर्सोवा बिच' हे सर्च स्ट्रींग दिलं. इंटरनेटवर बरीच माहीती, फोटो, जाण्याचे मार्ग अवतरले. त्याने ती माहीती वाचून जाण्याचा मार्ग नक्की केला. आता अजून काय करावं? त्याचं डोकं नुसतं सुन्न झालं होतं. चला तिने पाठविलेल्या जुन्या मेल वाचाव्यात आणि तिचे फोटो पहावेत म्हणून तो एक एक करुन तिच्या जुन्या मेल्स वाचू लागला. मेलच्या तारखांवरुन त्याच्या लक्षात आलं की त्यांचं 'प्रकरण' तसं जास्त जुनं नव्हतं. आज जेमतेम 1 महिना झाला होता जेव्हा ती प्रथम त्याला चॅटींगवर भेटली होती. पण त्याला त्यांची ओळख कशी कितीतरी वर्ष जुनी असावी असं वाटत होतं. त्यांनी एकमेकांना पाठविलेल्या मेल्स आणि फोटोंवरुन त्यांना एकमेकांचा पुरता अंदाज आला होता. स्वभावातल्या बऱ्याच खाचाखोचाही कळाल्या होत्या.

' ती आपण कल्पना केल्याप्रमाणेच असणार ना?' त्याच्या डोक्यात एक प्रश्न डोकावून गेला.

की भेटल्यानंतर आपण कल्पनाकेल्याच्या एकदम विपरीत कुणीतरी परकं, कुणीतरी अनोळखी आपल्यासमोर उभं रहायचं.

' चला प्रत्यक्ष भेटल्यानंतर ती शंका तरी दूर होऊन जाईल' त्याने तिच्या फोटोंचा अब्लम चाळता चाळता विचार केला.

अचानक त्याला त्याच्या मागे कुणीतरी उभं आहे याची चाहूल लागली. त्याने वळून पाहाले तर जॉनी गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहत होता.

'' साल्या आता प्रकरण एवढंच आहे तर तूला आजुबाजुचं भानही राहत नाही ... लग्न झाल्यानंतर तुझी काय स्थिती होते काय माहीत?'' जॉनी त्याला छेडीत म्हणाला.

'' अरे... तु केव्हा आलास?'' विवेक आपल्या चेहऱ्यावरचे गोंधळल्याचे भाव लपवित काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.

'' पुर्ण अर्धा तास तरी झाला असेल... लग्न झाल्यानंतर तु आम्हाला नक्कीच विसरणार असं दिसतं'' जॉनी पुन्हा त्याची छेड काढीत म्हणाला.

'' अरे नाही यार... असं कसं होईल?... कमीत कमी तुला तरी मी विसरु शकणार नाही'' विवेक त्याच्या समोर आलेल्या पोटात एक गुद्दा मारण्याचा अविर्भाव करीत म्हणाला.


क्रमश:... 


Read Agrovan ( Please Add Skeep ) ..............

No comments:

Post a Comment