Friday 15 March 2013

CH-31 तिची मेल

संध्याकाळची वेळ होती. अतूल सकाळपासून अजुनही त्याच्या खोलीत त्याच्या कॉम्प्यूटरवर बसलेला होता. अलेक्स त्याच्या शेजारी येवून उभा राहाला आणि त्याचं काय चाललं आहे ते पाहू लागला. अलेक्सची चाहूल लागताच अतूल कीबोर्डची काही बटनं दाबत म्हणाला,

'' ही बघ ही आहेत आपण काढलेली फोटो... काय कशी वाटतात?''

कॉम्प्यूटरच्या मॉनिटरवर अंजली आणि विवेकची हॉट फोटोज एखाद्या स्लाईड शो सारखी एका मागून एक अशी समोर सरकू लागली.

'' वा वा .. एकदम परफेक्ट... जस्ट लाईक अ प्रोफेशनल फोटोग्राफर...'' अलेक्स अतूलची स्तूती करीत म्हणाला.

'' पण नुसती ही फोटोग्राफ्स बघून काय होणार... आपल्याला पुढची काही हालचाल करावी लागेल की नाही... नुसतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉम्प्यूटरवर बसून काय होणार आहे '' अलेक्स त्याला टोमणा मारीत म्हणाला.

'' अरे ... आता पुढचं काम हा कॉम्प्यूटरच करणार आहे... आता आधी मी अंजलीच्या मेलबॉक्समधून विवेकला एक मेल पाठवतो... मग त्यानंतर तुझं काम सुरु होणार आहे'' अतूल म्हणाला.

'' तू माझ्या कामाबद्दल एकदम निश्चिंत रहा... फक्त आधी तुझं काम झालं की मला तसं सांग.. '' अलेक्स म्हणाला.

अतूलने अथक परिश्रम करुन मिळविलेला पासवर्ड देवून अंजलीचा मेलबॉक्स उघडला आणि तो मेल टाईप करायला लागला -

'' विवेक... प्रथम तुला लिहावं की नाही असा विचार केला ... पण नंतर ठरविलं की लिहावंच... आपण मुंबईला भेटल्यानंतर मी परत गेली आणि इकडे एक प्रॉब्लेम झाला... तसा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार नाही... पण तुझ्यासाठी तो प्रॉब्लेमच म्हणावा लागेल... इकडे माझ्या नातेवाईकांना काय वाटले कुणास ठाऊक पण त्यांनी तडकाफडकी माझं लग्न ठरवलं आहे... प्रथम मला खुप वाईट वाटलं पण मी नंतर सखोल विचार केला आणि मी या निश्कर्षाप्रत पोहचले की माझे नातेवाईक जे करीत आहेत ते माझ्या भल्यासाठीच... मुलगा चांगला आहे, अमेरीकेत शिकलेला आहे.... ... आमच्या तोडीची इंडस्ट्रीयल फॅमिली आहे... आता मला हळू हळू कळायला लागलं आहे की आत्तापर्यंत आपल्यात जे झालं ते एक अपरीपक्वतेचा परीणाम होता... म्हणून तुझ्या आणि माझ्यासाठी हेच चांगलं राहील की आपण काही झालंच नाही अशा तऱ्हेने सर्व विसरुन जायचं... आपण मुंबईला भेटलो होतो ते कदाचित माझ्या नातेवाईकांना माहित झालं आहे... तु मला भेटण्याची किंवा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते तुला काहीही करु शकतील... म्हणून मला तू या मेलचा रिप्लायसुध्दा पाठवू नकोस... माझा मेलबॉक्ससुध्दा कदाचित मॉनिटर केल्या जात आहे... काळजी घे... एवढंच मी तूला सांगू शकते... अंजली''

अतूलने मेल जणू अंजलीनेच टाईप करुन विवेकला पाठवावी या थाटाने टाईप केली. मेल संपूर्ण लिहिल्यानंतर त्याने पुन्हा तिवर एक धावती नजर फिरवली. त्याच्या चेहऱ्यावर एक गुढ हास्य लपवल्या लपत नव्हते. त्या मेलमधे काहीएक त्रूटी राहाली नाही याची खात्री होताच त्याने ती मेल विवेकला पाठवून दिली आणि अंजलीचा मेलबॉक्स बंद केला.


इकडे विवेक सायबर कॅफेमधे बसला होता. त्याला आशंका नव्हे खात्री होती की अंजलीची एखादी तरी मेल आलेली असेल. त्याने त्याचा मेलबॉक्स ओपन केला तेव्हा त्याला मेलबॉक्समधे अंजलीची मेल येवून पडलेली दिसली. त्याने तडकाफडकी , जणू त्याच्या शरीरात उत्साहाचा प्रवाह वहावा अशी ती मेल उघडली. मेल वाचता वाचता त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह क्षणात ओसरला होता आणि त्याचा चेहरा आता काळवंडल्यागत दिसत होता. मेल संपूर्ण वाचून झाली होती तरी तो शून्यात पाहाल्यागत समोरच्या मॉनिटरकडे बघत होता.

हे असे कसे झाले?...

ती आपली गंम्मत तर करीत नसावी?...

एक क्षण त्याला वाटून गेले.

तेवढ्यात सायबर कॅफेत एक माणूस आला. तो आल्या आल्या सरळ विवेकजवळ गेला. हळूच वाकून त्याच्या कानाशी आपलं तोंड नेत तो विवेकच्या कानात पुटपुटला -

'' विवेक... तुम्हीच नं?''

'' हो '' विवेक आश्चर्याने त्या माणसाकडे पाहत म्हणाला.

कारण तो त्या माणसाला ओळखत नव्हता.

'' अंजलीजी घरून पळून आल्या आहेत... बाहेर गाडीत आपलीच वाट पाहत आहेत...'' तो माणूस पुन्हा त्याच्या कानात पुटपुटला.

विवेकने पटापट कॉम्प्यूटरच्या मॉनिटरवर उघडे असलेले सगळे वेब पेजेस बंद केले. आणि त्या माणसाच्या मागे मागे सायबर कॅफेतून बाहेर पडला.


क्रमश:...  


Read All India Shri Swami Samarth Seva- ...

No comments:

Post a Comment