Thursday 14 March 2013

CH-8 अधीर मन

अंजलीने आज सकाळी आल्या आल्या तिच्या खुर्चीवर बसून कॉम्प्यूटर सुरु केला, चॅटींगचा विंडो ओपन केला आणि कुणाचा चॅटींगवर ऑफलाईन मेसेज आहे का ते बघू लागली. कुणाचाच ऑफलाईन मेसेज नव्हता. तिच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव तरळले पण ते लपवत ती तिच्या समोर टेबलवर ठेवलेले रिपोर्टस चाळायला लागली. तिच्या टेबलसमोर शरवरी बसलेली होती. ती बारकाईने अंजलीच्या एक एक हालचाली टीपत होती आणि गालातल्या गालात हसत होती. रिपोर्ट चाळता चाळता अंजलीच्या लक्षात आले की ती गालातल्या गालात हसत आहे. तिने पटकन एक कटाक्ष शरवरीकडे टाकला.

'' का गं का हसत आहेस?'' अंजलीने तिला विचारले.

शरवरीही मोठ्या सफाईने आपल्या चेहऱ्यावरचे हास्य लपवून गंभीर मुद्रा धारण करीत म्हणाली,

'' कुठे... मी कुठे हसत आहे?... ''

तेवढ्यात अंजलीच्या कॉम्प्यूटरचा बझर वाजला. अंजलीने पटकन मान वळवून उत्सुकतेने आपल्या कॉम्प्यूटरच्या मॉनीटरकडे बघितले आणि पुन्हा रिपोर्ट वाचण्यात मग्न झाली.

'' दोन दिवसांपासून मी बघते आहे की जेव्हाही चाटींगचा बझर वाजतो तू सर्व कामधाम सोडून मॉनीटरकडे बघतेस... काय कुणाच्या मेलची किंवा मेसेजची वाट पाहते आहेस की काय? '' शरवरीने विचारले.

'' नाही ... कुठे काय?'' अंजली म्हणाली आणि पुन्हा आपल्या टेबलवर ठेवलेले रिपोर्ट वाचण्यात मग्न झाली. म्हणजे कमीत कमी तसं भासवायला लागली. कॉम्प्यूटरचा बझर पुन्हा वाजला. अंजलीने पुन्हा पटकन उत्सुकतेने मॉनीटरकडे बघितले आणि यावेळी ती तिची चाकाची खुर्ची झटक्यात वळवून कॉम्प्यूटरकडे तोंड करुन बसली.

'' हा नक्कीच त्या विवेकचा मेसेज आहे'' शरवरी पुन्हा तिला छेडीत म्हणाली.

'' कोणत्या विवेकचा?'' अंजलीही काही न कळल्याचा आव आणित म्हणाली.

'' कोणता? ... तो त्या दिवशी चॅटींगवर भेटलेला'' शरवरीही तिला सोडण्याच्या मुडमधे नव्हती.

'' हे तू एवढ्या खात्रीने कसं काय म्हणू शकतेस?'' अंजलीने कॉम्प्यूटरवर काम करता करता विचारले.

'' मॅडम तुमच्या चेहऱ्याचा रंग सगळं काही सांगतो आहे'' शरवरी गालातल्या गालात हसत म्हणाली.

प्रथम अंजलीच्या चेहऱ्यावर चोरी पकडल्यागत गांगारलेले भाव आले. पण पटकन स्वत:ला सावरत ती रागाचा आव आणित म्हणाली.

'' तू जरा माझा पिछा सोडतेस ... केव्हापासून बघते आहे सारखी माझ्या मागे लागली आहेस... ऑफिसची बघ किती कामे पेंडीग पडली आहेत... ती जरा जावून बघ बरं..'' अंजली म्हणाली.

अंजलीचा इशारा समजून शरवरी तिथून उठली आणि गालातल्या गालात हसत तिथून निघून गेली.

शरवरी गेल्याबरोबर अंजलीने पटकन कॉम्प्यूटरवर आलेला विवेकचा मेसेज उघडला.



क्रमश:... 


Read devotional ( Please Add Skeep ) ...............

No comments:

Post a Comment