Tuesday 12 February 2013

मेहंदीच्या-पानावर-भाग-६

१२ मार्च
कालची संध्याकाळ मनावरचे खुप मोठ्ठे ओझे उतरवुन गेली. निदान माझ्या मनात मला बोचत असलेली अपराधीपणाची भावना तरी कमी झाली. मी जे करते आहे, जे करणार आहे, ते अगदीच काही चुकीचे नाही ही जाणीवच माझ्यासाठी खुप आहे.राजला 'पटवण्याच्या' प्रयत्नात मदतीला माझ्याबरोबर माझ्या दोन जिवाभावाच्या मैत्रीणीसुध्दा आहेत.
मला माझ्या भावना राजपर्यंत पोहोचवायला हव्यात. पण कधी? कसं? राज एकटा असा कध्धीच सापडत नाही. एक तर त्याचे फॅन्स नाही तर ती निधी. सारखं कोण ना कोणीतरी त्याच्या अवतीभोवती असतेच.
काय करता येईल की निधीपासुन राज काही क्षणांसाठी वेगळा असेल?
विचार करता करताच डोक्यात एक कल्पना आली.. 'फॅन्स..', स्तुती.. निधी जाम वेडी आहे असल्या गोष्टींमध्ये. कसेही करुन जर आशु आणी मॅन्डीने निधीला बोलण्यात गुंतवुन ठेवले..
मला जरी निदान राजशी दोन मिनीटं बोलायला मिळाली तरी निदान त्याच्या मनात माझ्याबद्दल काय आहे याचा अंदाज बांधता येईल.

१३ मार्च
हा हा हा… अजुनही हसु येतेय मला. आशु ग्रेट आहे, खरंच!! काय मस्त गुंगवुन ठेवले तिने निधीला. 'निधीजी तुमची गाणी अशी आहेत..', 'निधीजी तुमचा आवाज म्हणजे ना..', 'निधीजी असं, निधीजी तस्स.. 'काय पकडलं होतं तिला आज स्टुडीओ मध्ये. आणि मी? मी आतुतरतेने 'त्या' क्षणाची वाट बघत होते. आशुने मला हळुच खुण केली आणि मी अगदी सहजच राजच्या इथे गेले.
खरं तर खुप गोंधळल्यासारखे झाले होते मला त्याच्या समोर. मनाची खुप घालमेल झाली. एकदा वाटलं, वळुन पळुन जावं परत, कुठंही न बघता. पण मोठ्या मुश्कीलीने हिम्मत गोळा केली होती.
'राज, मला तुझ्याशी थोडं महत्वाचे बोलायचं आहे, शक्य असेल तर प्लिज मला या नंबरवर फोन कर' असं म्हणुन घाई-घाईतच माझा फोन नंबर लिहीलेला कागद त्याच्या हातात कोंबला आणि तेथुन निघुन गेले.
त्याची प्रश्नार्थक नजर माझ्यावर रोखलेली मला जाणवले होते, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल तर तो मला नक्की फोन करेल. त्याने फोन नाही केला तर… तर माझे उत्तर मला मिळालेच नाही का?
… पण करेल.. राज नक्की फोन करेल. मी 'माझ्या' राजला चांगले ओळखते. 
१५ मार्च
दोन दिवस होऊन गेले, राजचा फोन नाही. मी काय बोलले ते कळाले ना राजला? मी कागद बरोबर दिला ना त्याला? काय गडबडीत, वेंधळेपणाने दुसरेच काही हातात कोंबले त्याच्या फोनच्या प्रत्येक रिंगने वाढलेली उत्सुकता आणि 'तो' फोन राजचा नाही हे पाहुन चेहऱ्यावर पसरलेली नाराजी मी नाही लपवु शकत. दिवस-रात्र मी मोबाईलला कवटाळुनच आहे, जणु काही तो नाहीसा झाला तर माझं आयुष्यच संपुन जाईल.
स्टुडीओमध्ये नजर सतत राजलाच शोधत असते. पण तो दिसलाच नाही. मी विचीत्र तर नाही ना वागले? आमच्या मैत्रिचा मी चुकीचा तर नाही ना अर्थ काढला? माझ्या मुर्खपणामुळे थोडेफार का होईना जवळ आलेला राज माझ्यापासुन दुरावणार तर नाही ना??
….. कायमचा??

१७ मार्च
'कित्ती सोप्प असतं गं म्हणणं जाऊ देत ना' असं अगती आगतीकतेने म्हणाले होते मी आशुला. माझी तर खात्रीच पटत चालली होती की, खरंच मुर्खपणाच केला मी. निदान मित्र म्हणुन का होईना राज माझ्या जवळ होता. माझ्या मनाने मला पुर्णपणे धोका दिलेला होता. साफ चुक होता माझा विचार, माझ्या भावना. राजचा फोन तर सोडाच पण गेले ४ दिवस तो दिसला पण नव्हता आणि मी पुन्हा एकदा :(
घरात खुप सारा पसारा झाला होता. कुठलीही गोष्ट आवरुन ठेवण्याचा विचारच करत नव्हता. आय-ब्रोज करायची वेळ उलटुन गेलेली होती. आरश्यासमोरही जायला भिती वाटत होती. न जाणो चुकुन समोर एखादं अस्वलच दिसायचे :-।
गेले ४ दिवस मी माझी राहीलेलेच नव्हते. कुठल्याही गोष्टीवर निटपणे विचार करणे केवळ अशक्य झाले होते. डोक्यात इतक्या गोष्टी होत्या विचार करायला की कश्यावर आणि काय विचार करावा ह्यावर विचार करायला सुध्दा विचार करण्याचा विचार मला करवत नव्हता.
काय लिहीते आहे मी.. वेड लागलं आहे मला खरंच. 
२१ मार्च
'पटकन आवरुन तयार रहा, मॅन्डी येते आहे तुला पिक-अप करायला' आशु फोनवर जणु किंचाळतच होती.
'अग पण कश्याला? कुठे जायचे आहे? मी नाही येणार कुठे, कंटाळा आला आहे मला', मी उडत उडतच उत्तर दिले होते पण त्याआधीच आशुने फोन ठेवुन दिला होता
मी उपकार केल्यासारखेच आवरुन ठेवले. एखाद्या वादळासारखीच मॅन्डी आतमध्ये घुसली आणि मला जवळ जवळ ओढतच घराबाहेर काढले. आणि मी? एखाद्या वाळक्या पानासारखी तिच्यामागे फरफटत गेले होते आणि गाडीत जाऊन बसले.
मॅन्डीने गाडी थांबवली तेंव्हा भानावर आले. स्टुडीओच्याबाहेर आम्ही उभं होतो आणि मॅन्डी मला बोट दाखवुन काही तरी दाखवत होती. तिच्या बोटाकडुन त्या दिशेकडे माझी नजर गेली. दुरवर एक अंधुक आकृती मला दिसत होती… राज? छे.. क्षणभर वाटलं, मला दुसरं काही सुचतच नाही. पण नाही, तो राजच होता… आशुशी काही तरी बोलत होता.
मॅन्डी मला हाताला धरुन त्या दिशेने गेली, राजच्या बर्‍़याच जवळ गेल्यावर म्हणाली, 'आsssशु.. आम्ही कॅन्टीनमध्ये जात आहोत'
राजने मागे वळुन पाहीले. त्याच्या चेहर्‍यावर गोड हास्य होते आणि मी मात्र तेरा दिवसांचे सुतक पाळुन आल्यासारखी विस्कटलेली होते. मी तशीच मॅन्डीच्या मागे मागे कॅन्टीनमध्ये गेले. मला काय चालु आहे, काहीच्च कळतं नव्हते. मी कॅन्टीनमध्ये बसे पर्यंत मॅन्डीने कॉफी मागवली होती. मॅन्डी सारखी मागे वळुन वळुन बघत होती. कश्यासाठी? ह्याचे उत्तर मला काही क्षणातच मिळाले, कारण आशु राजला घेउन आमच्याच दिशेने येत होती.
राज येताच मॅन्डी उठुन उभी राहीली आणि त्याला ग्रीट केले, मी मात्र अजुनही मठ्ठासारखी बसुन राहीले होते. काय चालले आहे, खरंच काही कळत नव्हते मला.
राज खुर्ची ओढुन माझ्याशेजारीच बसला आणि इकडे तिकडे बघुन म्हणाला, 'हे सॉरी यार, थोडं कामासाठी बाहेर गावी गेलो होतो, जमलंच नाही बघ फोन करायला. आज आहे वेळ संध्याकाळी? 
मॅन्डीने मला हाताने ढोसले तेंव्हा राज पुन्हा तेच विचारत होता. शेवटी मॅन्डीच म्हणाली, "हो आहे ती संध्याकाळी"
'गुड.. मग आपण..'कॅफे रियाटो' मध्ये भेटुयात? ८.३० ला? थोडं लांब आहे, पण गर्दी कमी असते.' राज माझ्याकडे बघत विचारत होता.
'चालेल' मॅन्डीने माझ्यावतीने सांगुन टाकले होते. राज लगेच निघुन पण गेला. पण मी अजुनही तश्शीच उध्वस्त बसले होते.
'एssss बधीर.. आशुने गदागदा हलवले, अगं काय हे? तो तुला विचारतो आहे आणि तु काय अशी ढीम्म?'
कॅलीडोस्कोप कसा असतो ना? क्षणाक्षणाला आकार वेगळे, रंग वेगळा त्याचा अर्थ वेगळा. माझं आयुष्य तस्संच झालं आहे. आत्ता डायरी लिहीताना सगळ्या गोष्टी निट डोळ्यासमोर आल्या आणि आज संध्याकाळी राजला भेटायचं आहे ह्याची जाणीव झाली.
पुन्हा एकदा नविन आशा. एकदा वाटतं होतं जाऊच नये. निदान अपेक्षाभंगाचे दुःख तरी होणार नाही, मग वाटलं. राज वर खुप चिडावं, ओरडावं, मारावं आणि त्याला जवळ ओढुन घट्ट मिठीमध्ये समावुन घ्यावं. घड्याळाचा काटा पुढे पुढे चालला आहे आणि मला आवरायला खुप वेळ लागणार आहे.. खुsssप वेळ.. मला आज सर्वात सुंदर दिसायचं आहे, निधीपेक्षाही सुंदर. मी राजला अनुरुप दिसले पाहीजे, वाटले पाहीजे, राजची गर्लफ्रेंड असावी तर अश्शी.. बायको असावी तर अश्शीच.. नकळत लाजुन तळहाताने चेहरा झाकुन घेतला होता.
मन तर केंव्हाच कॅफे मध्ये पोहोचले होते, शरीराने तिथे पोहोचायला फक्त तिन तास उरले होते.. फक्त तिन तास..
[क्रमशः] 

No comments:

Post a Comment