Saturday 26 January 2013

छोटीसी कहानी.. भाग २

दोन तिन दिवसांपासुन थोडी तब्येत नरम गरमच होती राहुलची . सुटी घेतली असती तर तो खवीस ओरडला असता, आणि मग पुन्हा घरी जातांना सुटी देतांना त्याने इशु केला असता, म्ह्णून तापातच ऑफिस मधे गेला होता. क्रोसिन घशाखाली उतरवली कॉफीच्या घोटाबरोबर , आणि आपल्या क्युबिकल मधे बसला.
डोकं भयंकर दुखत होतं, दोन कप कॉफी संपवली तरी पण शांत वाटत नव्हतं. आता दिवाळी जवळच आली होती. दिवाळीच्या सुटीला लागुनच पंधरा दिवस एल टी सी घेतली होती. बॉस ने नेहेमी प्रमाणेच कुरकुर केली, म्हणाला, ग्रो अप!! बी प्रोफेशनल.. ( म्हणजे काय असतं?? ) आणि अजुनही बरंच काही सांगत होता की कसा तो नेहेमी सुटी न घेता काम करित असतो ते. म्हणे वर्ष भर कॅजुअल  सुटी घेतलेली नव्हती त्याने.आणि जर मोठं व्हायचं असेल तर सुट्या वगैरे विसरा , आता जर सुट्या न घेतल्याने मोठं होता येत असेल तर ते काय कामाचे??
दिवाळीसाठी घरी जायचं म्हणून तयारी सुरु करायलाच हवी. बरीच पर्सनल कामं पेंडींग होती, आईसाठी साडी, रश्मिचा ड्रेसचा कपडा आणि बरंच काही.उद्या सुटी आहे रविवारची, आणि पुढल्या शनिवारी निघायचंय. तेंव्हा  सगळी खरेदी आधी उद्याच आटोपावी लागेल कुठल्याही परिस्थिती मधे. एसी मधे पण दरदरुन घाम सुटला, बहुतेक क्रोसिनचा असर झाला असावा.. वॉश रुम मधे जाउन चेहेऱ्यावर पाण्याचा हबका मारला, आणि समोरच्या एसी ब्लोअर खाली  उभा राहिला . ताप उतरल्यामुळे आता एकदम फ्रेश वाटत होतं.
किती दिवसानंतर इतकं छान वाटलं बरं आज?? उत्साहाच्या भरात पिसी समोर जाउन बसला आणि कामाला सुरुवात केली. संध्याकाळी एमजी रोडला जायचं मनात नक्की केलं , आणि घरच्या आठवणींच्या गुंतून गेला. कसा बसा दिवस ढकलला, आणि  दुसऱ्या दिवसाच्या प्लानिंग मधे राहुल मग्न झाला.
शेवटी रविवारचा दिवस उजाडला. आज खुप काम करायचं होतं, मार्केटला गेल्यावर कपडे वगैरे खरेदी केली. आईची साडी, रश्मीचा ड्रेस , पप्पांचा शर्ट सगळं झालं , तेवढ्यात त्याची नजर समोरच्या काळ्या टॉप वर गेली.. आणि त्याला रिया आठवली.. तिला छान दिसेल ना??  आणि तो पण पॅक करुन घेतला होता – वेगळा!!
होता होता, एक आठवडा कसा भुर्रकन उडुन गेला, आणि राहुल दिवाळी साठी घरी निघाला.  एअर पोर्ट वर पप्पा आले होते रिसिव्ह करायला.आता पंधरा दिवस काही एक काम नाही करायचं.. नुसता आराम!! बस्स!असे विचार मनात येत होते.  इथे पण मनात सारखे तेच विचार सुरु होते, की यावं कां परत मुंबईला?? बस्स झालं !!
राहुल घरी पोहोचला. सगळे जण वाट पहात होते. रश्मी , रिया दोघी पण बसलेल्या दिसल्या. तेवढ्यात फोन ची घंटी वाजली, आई ने फोन उचलला, तर मुलाकडच्यांचा फोन होता. म्हणत होते की मुलगा उद्या संध्याकाळी परत जाणार आहे, तेंव्हा फक्त उद्याच सकाळीच वेळ आहे त्याला रश्मीला पहायला येण्यासाठी. रश्मी पण लाजुन लाल झाली होती. रिया पण खोडकर पणे रश्मी कडे पहात होती.मला या बद्दल काहीच माहिती नव्हते. ही सगळी डेव्हलपमेंट गेल्या दोन दिवसातली होती.  आई म्हणाली आता तुझा पण नंबर लाउ या लवकर..
दुसरा दिवस उजाडला, आणि सकाळीच दाखवणे हा कार्यक्रम आटोपला, दोघांचिही पसंती झाली, आणि लग्नाची तारीख पण नक्की करण्यात आली. इतक्या लवकर लग्न जुळतं?? राहुल थोडा आश्चर्य चकीत झाला. आई म्हणाली, की आता रश्मी सासरी गेली की मग घर एकदम रिकामं वाटेल , तेंव्हा आता दादूसाठी पण मुली पहायला हव्यात.असं कोणी म्हंटलं की लाजल्या सारखं होतंच ना.. आणि ते पण साहजिकच होतं म्हणा. आईने असं म्हंटलं की ऑफिसमधल्या वेगवेगळ्या मुलींना आपल्या बायकोच्या जागी कल्पना करुन मस्त टाइम पास व्हायचा. कधी भसा भसा सिगारेट ओढणारी ती सिन्हा बायको म्हणून कशी वाटेल? असा काही विचार मनात आला की राहुलला स्वतःचंच स्वतःला हसु यायचं. काही दिवसांपूर्वी ऑफिस पिकनिकच्या वेळेस ती शेजारी बसली होती बस मधे. रात्री परत येतांना पुर्ण टूल्ली होती.. राहुल बिचारा पुढचे दोन दिवस खांद्याला आयोडेक्स चोळत बसला होता.
रश्मीचं लग्नं ठरलं आणि मुलगा लगेच ऑन साईट जाणार, म्हणून लग्नाची तारीख फक्त एका आठवड्यानंतरचीच काढावी लागली. रश्मीचा पासपोर्ट अव्हेलेबल होताच. लग्न झाल्यावर डिपेंडंट व्हिसा मिळणं सहज शक्य होतं, म्हनुन लग्नाची घाई होती आणि घरातलं वातावरण एकदम बदलुन गेलं होतं. सगळीकडॆ खुप उत्साह होता. रिया पण सारखी रश्मी च्या मागे मागे असायची. दोघींचही पान एक मेकींच्या शिवाय पान पण हलत नव्हतं. सारखी रिया राहुलच्याच घरी असायची. तिचं पण कॉलेज संपलं होतं, त्यामुळे कूठलच टेन्शन नव्हतं तिला पण. लग्न  अगदी पुर्णपणे एंजॉय करित होती ती..
लग्नाचं शॉपिंग म्हणजे एक मोठं काम. रश्मीचे कपडे टाकले होते शिवायला. रश्मी म्हणाली की दादू कपडे आणून दे माझे, सोबत रियाला पण घेउन जा.. म्हणजे ती सगळं तपासुन घेईल व्यवस्थित आणि पुन्हा दुसरी चक्कर पण होणार नाही. राहुलच्या कपाळावर चार आठ्या उमटल्या. रश्मी राहुलच्या पुढे उभी राहिली आणि त्याच्या कपाळावरच्या आठ्या दोन बोटांनी सरळ करित म्हणाली.. इतकं वाईट  वाटून घ्यायला नको, रियाला सोबत ने म्हंटलं तर.आठ्या दूर कर दादू नाहीतर इस्त्री करावी लागेल !!
बाइकला किक मारुन स्टार्ट केली. रिया पण मागे बसली . जिन्स घातलेली असल्याने दोन्ही साईडला पाय घालुन बसली होती. बाइक सरळ सुरु करुन मार्केटला दुकाना समोर थांबवली. रिया खाली उतरली, तर राहुल म्हणाला, इथे नो पार्किंग आहे, तु जाउन सामान घेउन ये, मी  इथेच थांबतो . भर दुपारी दोन वाजताची वेळ होती. उन्हामुळे घामाच्या धारा सुरु होत्या. स्वतःवरच वैतागला राहुल. किती वेळ लावणार अजुन ही?? इतकी वेंधळी आणि हळूबाई असेल तर हिच्या नवऱ्याचं काही खरं नाही.. आणि स्वतःशीच हसला.. तेवढ्यात रिया परत आली आणि  बावळटसारखा हसणाऱ्या राहुल कडे आश्चर्याने पहात राहिली.
बराच वेळ उन्हात उभं असल्याने घसा कोरडा पडला होता, बाइक वर रिया बसली, आणि राहुलने बाइक सरळ समोरच्या शेट़्टीच्या हॉटेल समोर पार्क केली. तिने काही न बोलता हॉटेलमधे त्याच्या सोबत शिरली. तिचा चेहेरा लाल बुंद झाला होता उन्हाने. नाकाचा शेंडा थोडा जास्तंच लाल दिसत होता. घामाचे थेंब कपाळावर जमा झाले होते. पिटुकला रुमाल बाहेर काढून तिने चेहेरा पुसला.. आणि राहुलने काही म्हणण्या आधीच म्हणाली.. एक पेप्सी .. माझ्यासाठी..
लहानपणापासुन एक मेकांना ओळखत असल्यामुळे दोघंही कम्फर्टेबल होते. काहीतरी बोलायचं म्हणून राहुल म्हणाला, कॉलेज काय म्हणतंय? तिने वर पाहिलं, आणि तिच्या डोळ्यात पाहिल्यावर राहुलला समजलं की हा प्रश्न एक्स्पेक्टेड नव्हता.. शी वॉज एक्स्पेक्टींग समथिंग डिफरंट.. काय असावं बरं ते?? कपड्यांचं काम झालं होतं, आता इतर लहान सहान कामं पण होती, जसे भटजी बुवांना सांगून वेळ पक्की करणं, केटरर ला भेटुन मेनु मधले बदल सांगायचे वगैरे वगैरे..
रश्मी प्रत्येक ठिकाणी राहुलच्या बरोबर रियाला पाठवित होती. आणि रिया पण आनंदाने बाइकवर मागे  बसुन फिरायची. राहुल मात्र खुप वैतागला होता.. हे काय सारखं मगे शेपुट लावल्यासारखं हिला घेउन फिरायच? सगळी कामं मी एकटाच करु शकतो नां? मग ही ब्याद कशाला मागे उगीच? पण रश्मीचं मन मोडायचं नाही, म्हणून प्रत्येक वेळेस रियाला बरोबर घेउन जात होता.
कितीही नाही म्हंटलं तरी पण रिया बाइकवर मागे बसली की त्याला आवडायला लागलं होतं. बाहेरची कामं आटोपून दोघंही परत निघाली घरी जायला. घरी जाई पर्यंत राहुलला सारखं वाटत होतं की तिला काहीतरी बोलायचंय, पण त्याच्या काहीच लक्षात आलं नाही. एक आठवडा कसा निघून गेला ते समजलं पण नाही. रश्मिच्या लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाला फारच कमी लोकं बोलावले होते, फार कमी वेळ असल्यामुळे. लग्न आटोपुन रश्मी गेली तिच्या नवऱ्याबरोबर..  आता घरामधे अगदी कोणीच नव्हतं. आई तर खूप कंटाळली होती. सारखी डोळ्यात पाणी आ्णून रडत होती.रश्मी दोन दिवसानंतर येणार होती परत.
( पुढे चालु )

No comments:

Post a Comment