Wednesday 30 January 2013

पाठलाग – (भाग-३)

दिपकला झोप लागली असली तरी त्याच्या संवेदना जागृत होत्या. सैनिकी प्रशिक्षणाचा परीणाम म्हणा किंवा त्याचा सिक्स्थ सेन्स म्हणा परंतु दिपकला अचानक जाग आली. आपल्याला अशी अचानक जाग का आली असावी ह्याचा विचार करत तो जागेवरच पडुन आजुबाजुला घडणार्‍या घटनांचा वेध घेउ लागला. काही क्षण शांततेत गेल्यावर त्याला लॉकअपच्या बाहेर हलकीशी हालचाल जाणवली. किमान ३-४ व्यक्ती हलक्या आवाजात एकमेकांशी कुजबुजत होत्या.
दिपक कानोसा घेत पडुन राहीला.
थोडा वेळ शांततेत गेल्यावर त्याच्या लॉकअपचे दार हळुच उघडले गेल आणि बाहेर थांबलेल्या त्या व्यक्ती आतमध्ये आल्या. दिपक अजुनही स्तब्ध पडुन होता. हळु हळु त्या व्यक्ती दिपकच्या भोवती जमा झाल्या.
त्यांच्यातील एक व्यक्ती दिपकच्या अगदी जवळ आली होती. त्या व्यक्तीचा जोरजोराचा श्वाछोत्वास दिपकला ऐकु येत होता. त्या व्यक्तीची हालचाल दिपकला जाणवत होती. जणु काही दिपकला मारण्यासाठी त्याने एखादी जड वस्तु उगारली होती.
दिपकने अजुन काही क्षण वाट पाहीली आणि मग तो अचानक पाठीवर भार देउन गोल फिरला आणि एक लाथ अंदाजाने त्या व्यक्तीच्या दिशेने फिरवली.
बेसावध असलेल्या त्या व्यक्तीच्या तोंडावर दिपकची ती लाथ बसली आणि ती व्यक्ती हेलपांडत मागे पडली. त्या व्यक्तीच्या हातातील वस्तु खाली पडली आणि खण्ण्ण.. असा आवाज आला. आवाजावरुन ती वस्तु लोखंडी रॉड असावी हे दिपकने ताडले. दिपकने क्षणाचाही विलंब न करता बाकीच्या व्यक्तींवर हल्ला चढवला. दिपक चपळ होता, ताकदवान होता, पण ते तिघेही कमी नव्हते. त्यातील एकाची लाथ वेगाने दिपकच्या पोटात बसली आणि दिपक क्षणभर का होईना पोटावर हात धरुन खाली कोसळला.
त्या तिघांनीही वेळ न घालवता दिपकला पकडले. एकाने त्याचे हात घट्ट धरले, दुसर्‍याने एक जाड सेलोटेप दिपकच्या तोंडाभोवती बांधला तर तिसर्‍याने पोत्यासारखे एक जाड कापड दिपकच्या तोंडावर टाकुन घट्ट आवळले.
दिपकचा श्वास कोंडला गेला, त्याची शक्ती कमी पडु लागली. तो त्याच्या परीने शक्य तेवढा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होता तोच मगाचचा तो लोखंडी रॉड कुठुनतरी वेगाने दिपकच्या मानेवर बसला तसा दिपक थाड्कन खाली कोसळला. दुसर्‍या एकाने दयामाया न दाखवता दोन चार ला्था वेगाने दिपकच्या पोटात लगावल्या.
दिपकच्या डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. शेवटचे त्याला आठवले तेंव्हा त्याला गाडीच्या मागच्या डिक्कीत फेकण्यात आले होते आणि ती गाडी खडबडीत रस्त्याने वेगाने धावत होती. त्यानंतर मात्र दिपकला ग्लानी आली आणि तो बेशुध्द झाला.
——————————————————————————————————-
दिपकला जाग आली तेंव्हा त्याचे सर्वांग ठणकत होते, मुख्यतः मानेचा भाग जेथे लोखंडी रॉडचा जोरदार फटका बसला होता. त्याने डोळे उघडले तेंव्हा आजुबाजुला मिट्ट काळोख होता. डोळे चोळुन चोळुन पाहीले तरीही आजुबाजुचे काहीच दिसत नव्हते. तो आता गाडीच्या डिक्कीत नक्कीच नव्हता.
दिपक सावकाश उठुन बसला. सार्वजनीक मुतारी गृहात असतो तसला घाणेरडा वास सर्वत्र पसरला होता. जमीन गार आणि ओलसर होती. डासांचे साम्राज्य सर्वत्र पसरले होते. दिपकने हाता-पायावरुन हात फिरवला. डास चावुन चावुन मोठ्ठाल्ले फोड आले होते. नक्की कोणती जागा असावी ह्याचा कोणताही अंदाज दिपकला येत नव्हता.
ठणकणारे डोके घट्ट धरुन तो भिंतीला टेकुन बसला.
नक्की किती वेळ गेला असेल कुणास ठाऊक पण दिपकला शेवटी आजुबाजुला हालचाल जाणवली. दिपक आवाजाचा अंदाज घेऊ लागला तोच त्या जागेतला एक प्रखर दिवा लागला. बर्‍याच काळाने उजेड बघत असल्याने दिपकचे डोळे त्या प्रकाशाने दिपले गेले. दिपकने घट्ट डोळे मिटुन घेतले. तो एका छोट्याश्या १०x१० च्या खोलीत बंद होता. हिरवट रंगाची ती एक खोली होती. भिंतीचा रंग उडला होता तर काही ठिकाणी रंगाचे मोठ्ठाल्ले पोपडे निघाले होते. भिंतींमधुन पाणी पाझरत होते. जमीनीवर नावापुरत्या फरश्या होत्या ज्या बहुतांश ठिकाणी तुटलेल्या होत्या. समोर मात्र एक लोखंडी भक्कम दार होते.
दिपक खोलीतुन नजर फिरवत होता तेंव्हा ते दार उघडले गेले आणि आतमध्ये पोलिसी वेशातला एक ६ फुटी उंच, मजबुत बांध्याचा, सावळा, टकला माणुस आत आला. सावकाश पावलं टाकत तो दिपकपाशी येउन थांबला.
दिपक जागेवरुन उठला आणि म्हणाला, “मला इथे अश्याप्रकारे आणण्याचे कारण….”
त्याचे वाक्य पुर्ण होण्याच्या आधीच त्या पोलिसाने दिपकच्या एक थाड्कन मुस्काटात लावुन दिली. ती थप्पड इतकी जोरदार होती की दिपक मागच्या भिंतीवर जाउन आपटला. आधीच ठणकणारे त्याचे डोके त्या भिंतीवर आपटले गेले.
“इथे प्रश्न फक्त मी विचारतो…” वेगाने श्वास घेत तो म्हणाला…
“साल्या, सायबाच्या पोराला मारतोस काय? तुझी गेम झाली आता.. असा सडशील ह्या तुरुंगात की.. फाशीची शिक्षा का मिळाली नाही म्हणुन तुला पश्चात्ताप होईल. सायबाने फक्त एक फोन केला आणि तुझी उच्चलबांगडी झाली ह्या काळगृहात..”
“…………………..”
“तुला संपवायला ५ मिनीट पण लागली नसती, पण त्यामुळे ते मेलेलं पोरं थोडं न परत येणार आहे! तुला असा तडपवुन तडपवुन मारला पाहीजे.. एक एक क्षण तु निराशेत घालवला पायजेल.. ह्या इथे अंधार कोठडीत.. आजुबाजुला काहीच नाही.. तुझा भुतकाळ तुला खायला उठेल.. ह्या भिंती तुझं जगणं नकोसं करतील. तुझी विचार करण्याची शक्ती मंदावत जाईल. दिवस-रात्रीच गणीतच तुझ्या हिशोबी बिघडुन जाईल. इथली चिलटं, डास, माश्या तुला झोपुनही देणार नाहीत.
दिवसांतुन एकदाच तुला जेवायला मिळेल.. कोपर्‍यात ठेवलेलं हे पाणी तुरुंगाबाहेरच्या नाल्यातुन आणलं जात जिथं डुक्कर रोज सकाळ संध्याकाळ डुंबत असतात.
दोन दिवसांतुन फक्त एकदाच.. तिन तासासाठी तुला बाहेर येता येईल….” एवढं बोलुन तो गलेलठ्ठ पोलिस जाण्यासाठी वळला.
काही पावलं पुढे गेल्यावर त्याला काहीतरी आ्ठवले तसा तो माघारी वळला.
“…आणि अरे हो.. तुझं स्वागत करायचं तर राहुनच गेले.. असं म्हणुन त्याने कमरेचा पट्टा काढला आणि बक्कलाची बाजु पुढे करुन तो दिपकला बदडत राहीला…..”
——————————————————————————————————-
जाग आली तेंव्हा मगाचचा तो पोलिस निघुन गेला होता. खोलीतला दिवा अजुनही चालु होता. समोर एका वाकड्या तिकड्या झालेल्या ताटात थोडास भात आणि पाण्याचा जास्त अंश असलेला डाळसदृश्य पदार्थ होता. दिपक कहणत पुढे सरकला तसा त्या ताटातुन एक उंदराचे छोटे पिल्लु पटकन बाहेर आले पळत पळत खोलीच्या कोपर्‍यातील एका बिळात घुसले.
दिपकने ते ताट दुर सरकवले आणि तो पुन्हा भिंतीला टेकुन बसला. पट्याच्या त्या बक्कलाने दिपकच्या मानेवर, पाठीवर, हातावर जखमा झाल्या होत्या आणि त्यावर माश्या, चिलटं बसुन त्या अजुनच झोंबत होत्या.
दिपक एका कोपर्‍यात गुडघ्यात डोकं खुपसुन बसुन राहीला.
वेळेचे काही गणितच राहिले नव्हते. आत्ता दिवस आहे का रात्र? सोमवार आहे का शनिवार? काहीच काळात नव्हते.. कधी डोक्यात विचारांची गर्दी होत होती तर कधी अगदीच रिकामेपणा जाणवत होता. बसून बसून हात पाय आखडले होते, अंग सणकून दुखत होत.
कित्तेक तास उलटले परंतु जणू काही सर्व काही स्तब्ध झाले आहे असेच वाटत होते. नाही म्हणायला कोनाड्यातील बिळात घुसलेला तो उंदीर एव्हाना निर्ढावला. दीपक निरुपद्रवी आहे ह्याची त्याला खात्री पटली होती आणि म्हणूनच तो बिळातून बाहेर येऊन इकडे तिकडे फिरत होता.
दीपक बराच वेळ त्या उंदराची हालचाल टिपत राहिला. बराच वेळ म्हणजे किती हे कोणीच सांगू शकत नव्हते. कदाचित एखादा तास? कदाचित ४-५ तास? कदाचित अक्खी रात्र किंवा दिवस?
जेंव्हा जेवणाचे ताट आले तेंव्हा दिपकने अंदाज बांधला एक तर आत्ता दुपार आहे किंवा रात्रीची जेवणाची वेळ.. आणि त्याप्रमाणे तो दिवसांचे गणित जुळवू लागला.
दुसर्‍या दिवशी साधारण त्याच वेळेस जेवणाचे ताट घेऊन पांढरा कैद्याचा शर्ट आणि पिवळी पॅन्ट घातलेला वॉर्डन आला. त्याने दिपकचे पहीले भरलेले ताट पाहीले आणि तो बाहेर निघुन गेला. थोड्या वेळाने तो गलेलठ्ठ पोलिस आत आला.
“भेंन्चोx..माजला का रे.. गिळायला मिळतय फुकट तर गिळता येत नाही का?”
“….”
“गांx..आवाज फुटायचा बंद झाला का?”
“तुझ्या आय ने तुला असंच जेवायला घातलं होतं का?”, क्षिण स्वरात दिपक म्हणाला.
त्या पोलिसाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. वॉर्डनच्या हातातील रॉड त्याने काढुन घेतला आणि तो दिपकवर धावुन गेला. दिपक इंचभरही हालण्याच्या अवस्थेत नव्हता. त्या पोलिसाचा मार आधीच बधीर झालेल्या शरीरावर तो झेलत राहीला.
निपचीत, प्रतिकार न करणार्‍या, लोळा-गोळा झालेल्या दिपकमधला इंटरेस्ट निघुन गेला तसा तो पोलिस आधीकारी मारायचा थांबला आणि आपला वाढलेल्या श्वासावर नियंत्रण मिळवत तो तेथुन निघुन गेला.

 

अंदाजे तीन दिवसानंतर दीपकच्या कोठडीचे दार उघडले गेले. बाहेर उभ्या असलेल्या हवालदाराने आतमध्ये वाकून दीपकला बाहेर यायची खुण केली. दीपक जागेवरून उठला तेंव्हा त्याच्या डोळ्यासमोर अचानक अंधेरीच आली. तीन दिवसांत त्याच्या अंगात अतिशय अशक्तपणा आला होता. दीपक भिंतींचा आधार घेत बाहेर आला आणि बाहेरच्या प्रखर उन्हाने त्याचे डोळे दिपले गेले. दिपकने घट्ट डोळे मिटून घेतले.
त्या हवालदाराने एव्हाना दीपकच्या हातात साखळी वजा हातकडी घातली होती, त्याला धरून ओढत दीपकला तो काही अंतर घेऊन गेला, आणि तेथील एका भिंतीला टेकवून दीपकला उभे केले.
दीपक भिंतीकडे तोंड करून काही क्षण उभा राहिला आणि मग अचानक गार पाण्याचा एक जोरदार प्रवाह त्याच्या अंगावर येऊन थडकला. बराच वेळ तो हवालदार एखादी गाडी धुवावी तसा दीपकला लांबूनच धूत होता. नंतर त्याने एक बर्याच लोकांनी वापरून बुळबुळीत झालेला एक साबण दिपाक्कडे फेकला आणि कोपर्यात ठेवलेल्या कपड्यांकडे आणि फाटक्या टॉवेल कडे बोट दाखवून तो लांब जाऊन थांबला..
——————————————————————————————————-
आंघोळ झाल्यावर दीपकला थोडेफार फ्रेश वाटू लागले. बाहेरच्या पटांगणात दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती. दीपक प्रमाणेच अजून काही कैदी तेथे वावरत होते. शाळेत आलेल्या नवीन मुलाला जसे सर्व पाहतात तसे अनोळखी दिसणाऱ्या दीपककडे सगळेजण वळून वळून बघत होते.
थोडीफार रिकामी जागा पाहून दीपक तेथील एका खांबाला टेकून बसला.
दिपकने सभोवताली नजर टाकली. त्याच्या कोठडीप्रमाणेच आजूबाजूला पोलादी दरवाज्याच्या अनेक खोल्या होत्या. त्या बंद दरवाज्याच्या आत अजून कित्तेक कैदी असण्याची शक्यता होती. कदाचित.. त्यांचा बाहेर येण्याचा तिसरा दिवस होऊन गेला होता.. किंवा यायचा होता..
दूरवर उंच भिंतीचे कुंपण घातले होते आणि प्रत्येक कोपर्यात त्याहून उंच टेहळणी मनोरे उभारले होते, ज्यावर एक एक पोलीस अधिकारी बंदूक घेऊन उभा होता. कुठल्याही वाहनांचा किंवा रहदारीचा आवाज येत नव्हता, ह्यावरून हा तुरुंग नक्कीच कुठ्ल्यातेरी निर्जन भागी असावा हे दिपकने ताडले.
दिपकने बाकीच्या कैद्यांवरून नजर फिरवली. सर्वजण आपल्याच विश्वात मग्न होते. कुणीच कुणाशी काही बोलत नव्हते.. किंवा कदाचित कुणाशी बोलण्याची परवानगी नव्हती.
पटांगणाच्या मधोमध तो जाड-जुड गलेलठ्ठ पोलीस सर्वांवर नजर ठेवत फिरत होता. त्याला बघताच दिपकच्या डोक्यात संतापाची एक तडक उठली, कपाळावरच्या आणि मानेच्या शिरा ताणल्या गेल्या. दिपक ताडकन उठुन उभा राहीला.
"वेडेपणा करु नकोस.. खाली बस. तुझी वेळ पण येईल, पण आत्ता नाही..शांत रहा.. संधी येईल.." कोणीतरी खुसफुसल्या स्वरात बोलले.
तो आवाज इतका हळु होता की खरंच कोणी बोललं की आपल्याला भास झाला असं क्षणभर दिपकला वाटुन गेले. त्याने आजुबाजुला पाहीले. त्याच्यापासुन काही अंतरावर एक कैदी बसला होता. दिपकची आणि त्याची नजरानजर झाली. त्याने अगदी इंचभर मान हलवुन नाही अशी खुण केली आणि तो परत दुसरीकडे पाहु लागला.
दिपक पुन्हा खाली बसला.
थोड्यावेळाने एक बझर वाजला आणि सर्व कैदी उठुन आपल्या आपल्या कोठडीत जाऊ लागले. दिपकही उठुन उभा राहीला, जाताना त्याने त्या मगाचच्या त्या कैद्याकडे पाहीले. पण तो कैदी न बघताच निघुन गेला. दिपकने त्याची कोठडी बघुन ठेवली. दिपकच्या कोठडीपासुन डावीकडे ३ कोठड्यासोडुन त्याची कोठडी होती.
दिपक पुन्हा आपल्या अंधारलेल्या जगात परतला तसा बाहेरचा दरवाजा बंद झाला.. तिन दिवसांसाठी.
ह्या तासा-दोन तासांच्या ‘आऊटींगने’ दिपकला एक उभारी दिली होती. तो पहिल्यापेक्षा बरंच फ्रेश फिल करत होता. आणि निदान म्हणण्यापुरता का होईना त्याचे हित चिंतणारा त्याला कोणीतरी भेटला होता. त्या एका वाक्याने दिपकच्या मनात आत्मविश्वास भरला होता.
ह्या वेळचे ते तिन दिवस पट्कन गेले. ह्या वेळेस फक्त एकदाच त्या गुबगुबीत पोलिसांकडुन लाथा-बुक्यांचा प्रसाद दिपकने झेलला होता. बाहेर आल्या आल्या दिपकची नजर ‘त्या’ कैद्याला शोधत होती. आणि त्याला ‘तो’ दिसला. काही अंतरावर तो दिपककडेच बघत उभा होता. दिपक सहजच फिरत फिरत त्याच्या जवळ काही अंतर ठेवुन बसला.
थोड्या वेळाने तो कैदीही खाली बसला. दिपक त्याच्याशी बोलायची संधी शोधत होता तेवढ्यात त्याचे लक्ष त्या कैद्याच्या हाताकडे गेले. सहज हालचाल करावी तश्या अविर्भावात तो कैदी जमीनीवरील मातीत काहीतरी लिहीत होता.
"no say", फाटक्या तुटक्या इंग्लीशमध्ये त्याने वाळुत लिहीले होते.
"k", दिपकने कडेला लिहीले
"when?", पुन्हा दिपकने लिहीले
"३ + ३", त्या कैद्याने लिहीले आणि लगेच ते पुसुन तो तेथुन निघुन गेला.
प्रथम त्याचा अर्थ दिपकला उमगलाच नाही. दिपक बर्‍याच वेळ त्याचा विचार करत बसला आणि मग त्याच्या लक्षात आले की पुढच्या च्या पुढच्या वेळेस जेंव्हा दिपक पुन्हा कोठडीतुन बाहेर येईल..अर्थात अजुन तिन+तिन दिवसांनी…. कदाचीत तेंव्हा….
पण तेंव्हा काय?…. तेंव्हा काय???????????????????

No comments:

Post a Comment