Thursday 31 January 2013

तिच्यात हरवल्यावर

ती... कॉलेजचे लेक्चर ऑफ मिळाल्याचा आनंद क्षणभंगुरच टिकला कारण गाडी काढेपर्यंत आकाश काळ्या ढगांनी भरुन गेले होते. घरी जाईपर्यंत पाऊस पडणार हे खचीतच होते. वैतागुन गाडी काढली आणि शक्य तितक्या वेगाने घराकडे गाडी पळवली. चांदनी चौक पार करुन गाडी एन.डी.ए वरील माळरानाकडे वळवली. काही आठवड्यांपुर्वीचं उन्हानं रापलेल पिवळधम्मक गवत पावसाच्या आगमनाने हिरव्याकंच शालुत लपेटलं गेलं होतं.

पिवळ्या, गुलाबी रंगाची फुलं त्या गवताआडुन डोकावुन डोकावुन आपलं अस्तीत्व सिध्द करत होत्या. वार्‍याच्या झोक्याबरोबर झाडांच्या फांद्या बेधुंद होऊन झुलत होत्या. पण माझं लक्ष मात्र वेधुन घेतलं ’ति’नं. ’ती’ आमच्या कॉलेजमधली.. प्रत्येकाला आपलीच व्हावी अशी वाटावी अशी ती… दोन्ही हात पसरवुन ती डोळे मिटुन आकाशाकडे पाहात दुरवर उभी होती. मी गाडी कडेला लावली आणि शक्य तितक्या तिच्या जवळ जावुन तीला न्हाहाळु लागलो. काळ्याभिन्न मेघांच्या पार्श्रवभुमीवर तिचा तो पांढरा सफेद चुडीदार उठुन दिसत होता.

तिच्या चेहर्‍यावर पावसाचे रुपेरी, टपोरे थेंब बसले होते. मला पावसाचा इतका हेवा वाटला ना.. तिच्या अंगाला घट्ट बिलगुन बसला होता तो, तिच्या चेहर्‍यावरील पावसाचे थेंब सुध्दा तिच्या गालावरुन उतरायला तयार नव्हते, स्वतःच्या आगमनाने इतरांना अडकवुन ठेवणारा तो इथे मात्र तिच्या काळ्याभोर केसांमध्ये अडकुन बसला होता. मोठमोठ्या झाडांना हेलावुन सोडणारा तो सोसाट्याचा वारा इथे मात्र तिच्या केसांमध्ये मंद मंद रुंजी घालत होता. तिच्या पापण्यांची होणारी नाजुक हालचाल मनाला कावरं-बावरं करत होती.

तिच्या श्वाच्छोश्वासांचा आवाज ढगांच्या गडगडाटातही मला स्पष्ट ऐकु येत होता. वार्‍याची पुन्हा एक लहरं आली आणि तिच्या केसांची बट तिच्या चेहर्‍यावर जाऊन विसावली. परंतु तिने चेहर्‍यावरचे केस बाजुला घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. वाटलं, तिच्या जवळ जावं, तिच्या चेहर्‍यावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब ओंजळीत भरुन घ्यावेत..पावसाच्या शिडकाव्याने हवेत पसरलेल्या भिजलेल्या मातीच्या सुखंदापेक्षाही जास्त सुखद, जास्त मादक, मनावर आनंदाचे तरंग निर्माण करणारा तिच्या केसांमधला तो तजेलदार सुगंध श्वासामध्ये भरुन घ्यावा.

तिच्या शरीराची उब, थंडगार पडलेल्या माझ्या शरीरावर ओढुन घ्यावी. नुसत्या विचारांनीच अतीव सुखाने डोळे मिटले गेले आणि शांतपणे झाडाला टेकुन उभा राहीलो. डोळे उघडले तेंव्हा ती माझ्या समोरच उभी होती. तिची नजर माझ्या डोळ्यांना भेदत आरपार हृदयाला जाऊन भिडली. अचानक तिच्या सामोर्‍या येण्याने मी भेदरुन गेलो. काय बोलावे काहीच सुचेना.. सारवासारव करण्यासाठी तोंड उघडले, पण शब्द घश्यातच अडकले. ती माझ्याकडे बघुन खुदकन हसली आणि हृदयाचा एक ठोका चक्क क्षणभर थांबुन गेला. तिने माझा हात धरला आणि मला हळुवारपणे पावसात ओढले. तिचा तो स्पर्श…… अंगावर काटा आला… मानेवरचे केस उभे राहीले. मी हिप्नॉटाईझ झाल्यासारखा तिच्या मागोमाग चालत गेलो.

जमीनीवरील हिरवीगार गवताची पाती पावसाच्या आगमनाने जितके प्रफुल्लीत झाली नसतील तितकी तिच्या ओढणीच्या स्पर्शाने ती मोहरुन जात होती. गुलाबी फुलं तिच्या गालावर पसरलेल्या लालीशी बरोबरी करण्याचा असमर्थ प्रयत्न करत होती. जमीनीवर साठलेल्या तांबुस-चॉकलेटी पाण्याला झालेला तिच्या पावलांचा स्पर्श त्याला बेभान करुन टाकत होता. मी कुठे वहावत चाललो होतो, माझं मलाच ठाऊक नव्हतं.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत…

माझंही तस्संच झालं होतं.. माळरानाच्या एकदम कडेला मी तिच्याबरोबर येऊन पोहोचलो. समोर धुक्यात हरवलेलं माझं गाव होतं.. पावसांच्या सरीत भिजलेले रस्ते होते, नखशिखांत नटलेले डोंगर होते. ति एका खडकावर बसली, मी तिच्या शेजारीच.. तिला खेटुन बसलो.. माझी मान आपसुकच तिच्या खांद्यावर विसावली. पावसाच्या थेंबाने भिजलेला वारा सर्वांगाला झोंबत होता. भिजलेले शरीर त्या थंड वार्‍याने शहारत होते. तिने माझ्या हातावर तिची ओढणी पांघरली.. इतक्यावेळ धडधडणारे हृदय आता शांत झालं होतं.

आसमंतातले सर्व आवाज जणु माझ्या कानापर्यंत येऊन परत गेले होते. स्पेस.. अवकाशातली शांतता जणु आजुबाजुला विखरुन पडली होती. मी जड झालेले डोळे उघडुन तिच्याकडे पाहीले.. साखरेसारखे तिचे गोड डोळे मी कित्तेक वेळ पहात राहीलो. तिने तिच्या बोटाचे नख माझ्या मनगटापासुन खांद्यापर्यंत फिरवले. तो स्पर्श मला अंगावर हजारो मोरपिस फिरवल्यासारखा भासला. नकळत माझा हात तिच्या मानेवरुन फिरत तिच्या नाजुक गळ्य़ापर्यंत आला. आवेगाने तिने मला घट्ट मिठी मारली….. तिचा गरम श्वास माझ्या मानेवर रोमांच निर्माण करत होता. तिच्या हृदयाची धडधड माझ्या हृदयाला जणु काही सांगु पहात होती. सुखाच्या त्या परमोच्च क्षणात बुडालेले असतानाच मागे उभा राहीलेला पोलीस म्हणाला…”ओ लैला मजनु.. चला उठा इथंन.. आपल्या घरी जाऊन रोमान्स करा.. उठा

No comments:

Post a Comment