Wednesday 30 January 2013

छोटीसी कहानी.. भाग १

संध्याकाळचे साडे सात वाजले होते. हिवाळ्याचे दिवस.. थोडं अंधारल्या सारखं झालं होतं बाहेर. राहुल वय वर्ष १५ समोरच्या सोफ्यावर बसुन हातात केमेस्ट्रीचं पुस्तक घेउन आणि त्या मधे फॅंटमचं कॉमिक्स लपवुन वाचत बसला होता. आई ओरडली की अभ्यास करतोय म्हणुन सांगायला. हे कॉमिक्स वाचणं म्हणजे एकदम पास टाइम.. आणि आजकाल तर जेम्स हॅडली ची पुस्तकं वाचायची पण गोडी लागली होती.
आतल्या खोलित राहुलची लहान बहीण  रश्मी  वय वर्ष १२ असेल, बसली होती आपल्या जिवश्च कंठश्च मैत्रीण रिया  बरोबर खेळत. रिया आणि रश्मी लहानपणापासुनच्या मैत्रीणी. दोघी पण अगदी फ्रॉकला रुमाल पिनेने टाचुन बरोबर जायच्या बालक मंदिरात. तेंव्हापासुनची मैत्री. दर रोज संध्याकाळ झाली की रिया इकडे म्हणजे रश्मी कडे  यायची खेळायला. दोघींचं एकत्र खेळणं सुरु असायचं मग.. बहुतेक बाहुली सोबत खेळणं .. आणि उरला वेळ फिदी फिदी हसत रहायच्या दोघी पण.. अगं काय झालं?? म्हणुन विचारलं, तर   काहीच नाही म्हणुन अजुन जोरात हसायच्या. वेळ उरलाच तर घराच्या मागे असलेल्या घसरगुंडीवर आणि झुल्यावर खेळायला जायच्या दोघी पण.
एक मेकावर न रागावणं या बाबतीत मात्र त्यांचं एकमत होतं. कधी तरी भांडणं पण व्हायची दोघींची , पण ती क्षणभंगुर असायची.  थोडा अंधार झाला, आणि रामरक्षा म्हणायची वेळ झाली की , अरे दादू , सोड ना रे रियाला तिच्या घरी… म्हणुन रश्मी मागे लागायची. आता शेजारच्या पाच बिल्डींग सोडून घर.. कशाला हवी सोबत ?? आणि एकाच तर कॉम्प्लेक्स मधे आहे? मुंबई एकदम सेफ आहे, काही होत नाही.. जाउ दे एकटीला, फारतर बाल्कनीतुन पाहतो ती घरी जाई पर्यंत.
रिया, टिपिकल कोकणस्थी स्वच्छ गोरा रंग, ब्राउन डोळे.. दिसले की अगदी मनाच्या अंतरंगापर्यंत ठाव घेतील असे.. लांब वेणीच्या टोकाला बांधलेल्या शाळेच्या निळ्या रिबन्स.. बारीक फुला फुलांचा फ्रॉक उगिच डोळ्यात आर्त भाव आणुन राहुल कडे पाहु लागली, आणि राहुल ह्या नजरेलाच खुप घाबरायचा. तिने अशा नजरेने पाहिलं की ह्याला नाही म्हणताच येत नव्हतं, आणि हीच गोष्ट नेमकी रियाला पुर्ण पणे माहिती होती.
चरफडतच हातातलं पुस्तक खाली टाकुन उठला राहुल, आणि पायात चप्पल अडकवुन तयार झाला. रिया कडे बघितलं.. शांत चेहेरा…हसरे डोळे… आणि थोडा वात्रटपणा.. कसं हो म्हणायला लावलं तुला म्हणुन डोळ्यातुन ओसंडुन वहायचा!!!!
राहुल हेच काम , म्हणजे रियाला घरी सोडायचं गेली कित्येक वर्ष न चुकता करित होता. आता त्याची सवय पण झाली होती. रस्त्याने जातांना, तु लवकर कां घरी जात नाहीस?? रोज च्या रोज  मला का त्रास देतेस?? असं म्हंटलं, तर सरळ हसुन दुर्लक्ष करायची. या वयात म्हणजे १४-१५ वय असतांना मुलांना नेमकं आपल्याला कोणी कुठल्याही मुली सोबत पाहू नये असं वाटत असतं. आणि नेमकं इथे रोज रियाला सोडातांना शेजारच्या बिल्डींग मधली मुलं बघायची, त्यामुळे अजुन चिडायचा राहुल..
हाच प्रकार गेली कित्येक वर्ष चालत होता. रिया ला घरी सोडणं.. आता राहुलचं इंजिनिअरिंगचं पाचवं सेमिस्टर होतं. रिया आली होती १२वीला. तरी पण रोज संध्याकाळच्या येण्यामधे काही खंड पडला नव्हता. लहान असतांना रिया ने रश्मीच्या घरी येण्याचं कारण होतं ते घराच्या मागे असलेला झुला आणि घसरगुंडी.. पण आता मोठ्या झाल्यावर पण रियाचंच येणं सुरु राहिलं. आता घसरगुंडीवर खेळण्याचे किंवा झुल्यावर झुलण्याचे दिवस गेले होते. पण सवईचा परिणाम.. अजुनही रिया दररोज अगदी न चुकता संध्याकाळी यायची गप्पा मारायला. त्यांच्या हळू हळू आवाजात गप्पा सुरु असल्या की आई ओरडायची.. काय गं? कसल्या गप्पा मारताय इतक्या? पण काही नाही गं, उगिच काहीतरी बोलतोय झालं. असं उत्तर द्यायच्या.
राहुलला रिया बद्दल तसं कधीच अट्रॅक्शन वाटत नव्हतं . आता  १७ -१८ वर्षाची झाल्यावर रिया तर   सुंदरच दिसायची यात काहीच संशय नाही,पण तिच्या कडे बघितलं, की तिचा तो लहानपणी पाहिलेला ( फ्रॉकला रुमाल पिन ने टाचलेला ) अवतारच आठवायचा राहुलला , तर कधी त्या रुमालाने नाक पुसणारी रिया आठवायची, आणि त्यामुळे तशा नजरेने कधीच तिच्याकडे पाहु शकत नव्हता तो..  थोड्याच वेळात रश्मिने एक प्लेट आणली आणि समोर ठेवली.. केक आणि वेफर्स..  म्हणाली की आज रियाचा वाढदिवस आहे.. म्हणुन केक. राहुल उठला आणि उगिच पुटपुटला हॅपी बर्थ डे म्हणुन.. तिच्या कडे न पहाता.. का कोणास ठाउक पण आज राहुलला रियाकडे सार्ख पहात रहावंसं वाटत होतं.
खुपच सुंदर दिसत होती रिया आज. राहुलने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि   आपलं वाचन  सुरु ठेवण्याचा प्रयत्न करु लागला . रिया ने थोडं हसल्यासारखं, केलं आणि आतल्या खोलीकडे वळली. साडी नेसली की मुलगी कित्ती मोठी   दिसते नां?? राहुलची नजर पुस्तका वरुन विचलीत झाली होती..
संध्याकाळी नेहेमी प्रमाणे   प्लिज  रियाला सोडुन ये ना रे दादू  … रश्मी म्हणाली. आणि  नेहेमी प्रमाणेच कुरकुर करता पायात चप्पल अडकवुन राहुल तयार झाला. तसं रिया चं घर बरोबर सहाव्या बिल्डींग मधे , पाचव्या मजल्यावर होतं. दोघंही बाहेर निघाले, आणि तेवढ्यात एकदम जोरात पाउस सुरु झाला. जवळच असलेल्या बिल्डींग  कडे दोघांनी पण धाव घेतली. आडोसा धरुन दोघंही उभी राहिली. तिचा पदर अंगावर चिकटला होता, थोड्या पावसामुळे, ती आपले कपडे उगिच व्यवस्थित केल्या सारखे करित होती.  मुंबईचा पाउस.. लवकरच थांबला, आणि तिला सोडुन परत निघाला राहुल.
१२वीचा निकाल लागला होता, आणि नेमकं रियाला पुण्याच्या  लॉ कॉलेज मधे ऍडमिशन मिळाली होती. इतक्या दिवसांची /वर्षांची सवय असल्यामुळे दोघींना पण खुप वाईट वाटत होतं. आता संध्याकाळ कशी जाईल म्हणुन रश्मी पण अपसेट झाली होती. दोघींनी पण दिवस भर मस्ती केली , आणि शेवटी जड मनाने रियाला निरोप दिला. तशी रिया अधुन मधुन येतंच रहाणार होती मुंबईला..
होता होता,काही वर्ष निघुन गेली. रियाचं कॉलेज सुरु होतं. इकडे राहुलचं इंजिनिअरींग पुर्ण झालं होतं. त्याला पण नोकरी लागली होती , आता कामानिमित्य बॅंगलोरला जावं लागलं राहुलला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग करुन आयटी कंपनीत काम करणं सुरु केलं होतं त्याने. दिवस मस्त जात होते. सगळं नविन वातावरण.. इथे पण सेट झाला होता राहुल. घरची आठवण तर यायचीच. नेहेमीच घरी जावंसं वाटायचं. आईच्या हातचं जेवण सगळ्यात जास्त मिस करित होता राहुल.
इथे पैसा वगैरे जरी चांगला मिळाला, तरी पण मानसिक समाधान नव्हतं. सारखं काही तरी टेन्शन असायचंच.. प्रोजेक्ट्स , डेड लाइन्सच्या रगाड्यात इतर कुठल्याही गोष्टींचा विचार करणं शक्य होत नव्हतं. सभोवताली दिसणाऱ्या कॉस्मोपॉलिटीयन कल्चरच्या मुलींच्या कडे कधीच लक्ष गेलं नव्हतं.  लंच टाइम मधे समोरच्या पान टपरीवर मुली पण मुलांच्याच बरोबरीने सिगारेट ओढतांना पाहुन थोडं चुकल्या सारखं व्हायचं.. नुकताच एक मित्र लिव्ह इन रिलेशनशिप मधे गुंतला होता. आपणही तसंच काही तरी करावं असं वाटायचं, पण हिम्मत होत नव्हती . किती दिवस काढायचे असे??
अर्थात दर चार सहा महिन्यांनी एक चक्कर तर घरी मुंबईला व्हायचीच. मग एकदा घरी गेलं ,की नुसते कोड कौतुक करुन घ्यायला आवडायचं राहुलला. आई मग मुलगा आला म्हणुन चांगलं चुंगलं खायला करणार.. मजा यायची. सुटीचा तसा प्रॉब्लेम असायचाच, त्यामुळे मात्र थोडा कंट्रोल आला होता सारखा मुंबईला जाण्याबद्दल. आता इथे मुंबईला नौकरी मिळाली तर कित्ती बरं होईल असं वाटत होतं. आयुष्यातल्या प्रायोरीटीज बदलल्या होत्या. ऑन साइट जायला मिळावं म्हणुन पण प्रयत्न सुरु होतेच. जर ऑन साईटचा लालिपॉप नसता, तर ही नौकरी कधीच सोडली असती, आणि मुंबईला परत गेलो असतो , असा विचार तर नेहेमीच धडका मारायचा .
( पुढे चालु )

No comments:

Post a Comment